भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील धादरी उमरी परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढला असून रविवारी (दि. २३) सकाळी शेतात गेलेल्या महिपाल शेंडे (वय ६१, रा. धादरी) व वामन भालाधरे (वय ५७, रा. तिरोडा) यांच्यावर रानडुकरांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही या परिसरात रानडुकरांनी नागरिक व शेतकºयांवर हल्ले केले आहेत. विशेषत: दि. १३ आॅगस्ट रोजी एकाच दिवशी पिसाळलेल्या रानडुकरांनी सहा जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले होते. वारंवार होणाºया हल्ल्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवाची वन विभागाला यापूर्वी अनेकदा माहिती देण्यात आली होती. त्यानंतर रविवारी वनरक्षक चंद्रकुमार पारधी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दहा वन कर्मचाºयांनी धादरी उमरी परिसरात रेस्क्यू मोहीम राबविली. रानडुकरांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले; मात्र बहुतांश रानडुकरे पसार झाली.
या कारवाईत केवळ एका रानडुकराच्या पिल्लाला पकडण्यात यश आले. त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. सध्या खरीप हंगामातील शेतीची कामे जोरात सुरू आहेत. धान पिकाची फवारणी, डवरणी, निंदणी तसेच पिकांची पाहणी करण्यासाठी शेतकºयांना दररोज शेतात जावे लागते. मात्र रानडुकरांच्या भीतीमुळे शेतात जाणेही धोकादायक ठरत असल्याने शेतकºयांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. जखमी दोन्ही व्यक्तींवर उपचार सुरू असून त्यांना वन विभागाकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, यापूर्वी जखमी झालेल्या नागरिकांना अद्याप आर्थिक मदत मिळाली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत हुमने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.