शोभना गौरशेट्टीवार /भंडारा पत्रिका पवनी : पवन राजाची नगरी म्हणून ओळख असलेल्या पवनी शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जवाहर गेटसह वैनगंगा नदीकाठच्या प्राचीन घाटांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गड-किल्ले संवर्धन व पुरातत्व विभाग, नागपूर यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. शहराचे दर्शनी प्रवेशद्वार असलेल्या जवाहर गेटची रंगरंगोटी व दुरुस्तीची कामे अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत. पवनीतील ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी बाहेरगावाहून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. तसेच ऋषिपंचमी व अधिक मासाच्या काळात महिला-पुरुष भाविक वैनगंगा नदीत स्नान करण्यासाठी येत असतात. त्यामुळे नदीकाठच्या घाटांची दुरुस्ती व सुरक्षितता अत्यावश्यक आहे.
जवाहर गेटच्या किल्ल्यावर दरवर्षी १५ आॅगस्ट व २६ जानेवारी या राष्ट्रीय दिनानिमित्त नागरिकांकडून ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूची डागडुजी व रंगरंगोटी करणे गरजेचे आहे. वैनगंगा नदीकाठावरील दिवाणघाट, ब्राह्मण घाट, पानखिडकी, घोडे घाट, वैजेश्वर घाट व कारभारी घाट हे सुमारे ३०० ते ४०० वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक घाट आहेत. अनेक घाटांची अवस्था जीर्ण झाली असून वैजेश्वर घाटावरील बुरुजांसह काही वास्तू मोडकळीस आल्या आहेत. यामुळे स्थानिक नागरिक तसेच बाहेरगावाहून येणाºया पर्यटकांना स्नान व कपडे धुण्यासाठी सुरक्षित व्यवस्था उपलब्ध होत नाही. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घाटांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून जवाहर गेटची दुरुस्ती व रंगरंगोटी तसेच वैनगंगा नदीकाठच्या प्राचीन घाटांच्या पुनर्वसनाचे काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.