बदली रद्द करण्यासाठी २५ हजारांची लाच

भंडारा जिल्हा रूग्णालयातील दोघे एसीबीच्या जाळ्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याची बदली रद्द करून जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्रात ड्युटी कायम ठेवण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या भंडारायातील आरोग्य विभागातील दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी, १३ ऑक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीव ज्ञानीराम नेतामी व आरोग्य सहायक प्रवीण माधव वडवाईक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराची २९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद भंडारा येथील आरोग्य विभागाच्या साठरोग विभागात बदली करण्यात आली होती. त्याच दिवशी त्यांना कार्यमुक्त करण्याचे पत्रही प्राप्त झाले होते. मात्र, साठरोग विभागात काम करण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बदलीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. तेथे समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला.

यावेळी आरोग्य सहायक प्रवीण वडवाईक याने जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील ड्युटी कायम ठेवायची आणि साठरोग विभागातील बदली रद्द करायची असल्यास वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीव नेतामी यांच्याशी बोलून आदेश रद्द करून देण्यासाठी डॉ. नेतामी यांच्याकरिता २५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली. त्यापैकी १५ हजार रुपये प्रथम आणि बदली रद्द झाल्यानंतर उर्वरित १० हजार रुपये देण्याचे ठरले.

दरम्यान तक्रारदाराने भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता तक्रारीच्या अनुषंगाने १२ ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, भंडारा येथे पंचंच्या उपस्थितीत लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान झालेल्या संभाषणातून संबंधितांनी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे सिद्ध झाले. १३ ऑक्टोबर रोजी सापळा रचून जिल्हा प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय भंडारा येथील पोर्चमध्ये आरोग्य सहायक प्रवीण वडवाईक याने तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. एसीबीने दोन्ही आरोपांना ताब्यात घेतले असून भंडारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्यामार्गदर्शनात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडाराचे पोलीस निरीक्षक नितेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस हवालदार शिलपेंद्र मेश्राम आणि पोलीस अंमलदार प्रतिक उके, मयूर सिंगणजुडे, हितेश हलमारे व विष्णू वरठी यांचा समावेश आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *