पाण्याचा वेग अधिक असल्याने अडथळे; मोठे दगड आणि भरावाच्या पोत्यांचा वापर
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
तिरोडा : तालुक्यातील बोदलकसा तलावाला १२ ऑक्टोबर रोजी पडलेले भगदाड बुजविण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, भगदाडातून वेगाने पाणी वाहत असल्याने ते बुजविण्याच्या कामात अडचणी येत आहेत. तलावातील पाण्याचा प्रवाह कमी करण्यासाठी वेस्टवेअरला भगदाड पाडून अतिरिक्त पाणी वळविण्यात आले आहे. तरीही तलावात सध्या जवळपास ७० टक्के पाणीसाठा असल्याने पाण्याचा वेग अद्याप कायम आहे.
१४ ऑक्टोबर रोजी भगदाड पडल्याचा तिसरा दिवस असून, प्रशासनाने मोठे दगड आणि भरावाची पोती टाकून पाणी अडविण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तलावातील पाण्याची पातळी ५० टक्क्यांपर्यंत खाली आल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड आणि तिरोड्याचे तहसीलदार एन. एम. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटबंधारे विभाग व महसूल प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी काम करीत आहेत. पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंता सोनाली चोपडे, सर्कल इंजिनिअर राजेश पाटील, कार्यकारी अभियंता राजीव कुथेकर आणि उपअभियंता सी. बी. डोंगरे यांच्यासह संबंधित अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
तलावातील पाण्याचा प्रवाह आणि भगदाडाची स्थिती लक्षात घेता, धोकादायक ठिकाणी पाटबंधारे व महसूल विभागाकडून २४ तास गस्त घातली जात आहे. पाण्याचा वेग कमी करून जलसाठा वाचविण्यासोबतच संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, धोकादायक भागात जाने टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.