भंडारा जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करा!

शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन संजय रेहपाडे यांचे मुख्यमंत्री यांना निवेदन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

खापा/तुमसर : भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामातील हलक्या प्रतीच्या धानाची कापणी सुरू झाली असून, अद्याप शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय रेहपाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे.

भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धान कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र, शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

धान कापणी सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना आपला शेतात सुरक्षित ठेवणे, त्याची मळणी करणे आणि पुढील हंगामासाठी शेतजमीन तयार करणे आवश्यक असते. मात्र, शासकीय खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला धान विक्रीसाठी अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे कमी দराने धान विकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावीत. तसेच शेतकऱ्यांना त्यांचा धान योग्य दरात विकता यावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जिल्हा प्रमुख संजय रेहपाडे यांनी निवेदनातून केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने विलंब न करता धान खरेदी केंद्र सुरू करावीत, अन्यथा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आलेले हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले असून, शासन यावर काय निर्णय घेते, याकडे भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या वेळी उपस्थित जिल्हा समन्वयक सुधाकर कारेमोरे, उपजिल्हा प्रमुख किशोर चन्ने, साकोली तालुका प्रमुख प्रमोद मेश्राम, तुमसर तालुका प्रमुख ईश्वर भोयर, मोहाडी तालुका संघटक शोभारा राम तिजारे, मोहाडी तालुका प्रमुख प्रवीण गावधने, भंडारा शहर प्रमुख राकेश आग्रो, पवनी तालुका प्रमुख दिनेश नंदपुरे, लाखांदूर तालुका संघटक विनायक सरोदे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय झंझाड उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *