भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचा उद्देश ठेवण्यात आला असला, तरी भंडारा जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी अत्यंत संथ आणि विस्कळीत झाल्याचे वास्तव समोर आले आहे. ‘हर घर नल से जल’ हा नारा दिला असला, तरी अनेक गावांमध्ये ही योजना अजूनही कागदावरच असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये या योजनेची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र दोन वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही अनेक ठिकाणी पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. काही गावांमध्ये पाइपलाइन टाकण्याची कामे अर्धवट अवस्थेतच थांबली असून, खोदलेले रस्ते तसेच पडून असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
जिल्ह्यातील हजारो घरांपर्यंत नळ पोहोचवण्याचा आराखडा तयार करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात अनेक कुटुंबे आजही पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी, हँडपंप किंवा दूरवरच्या स्रोतांवर अवलंबून आहेत. त्यामुळे ‘नळातून पाणी’ हे स्वप्नच ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. योजनांच्या अंमलबजावणीत प्रशासनाचा ढिसाळपणा उघडपणे दिसून येत आहे. कंत्राटदारांकडून कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने प्रकल्प रखडले आहेत. काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असल्या, तरी त्या केवळ शोभेच्या वस्तू ठरत असून पाणीपुरवठ्याची यंत्रणा सुरूच झालेली नाही. सुरुवातीला स्थानिक नागरिक व जनप्रतिनिधींनी मोठ्या उत्साहात या योजनांचे भूमिपूजन केले होते. मात्र कालांतराने कामाचा वेग मंदावला आणि अनेक प्रकल्प ठप्प झाले. परिणामी, योजना सुरू असलेल्या गावांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी नागरिकांना अजूनही प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या योजनेच्या अपयशामुळे शासनाच्या कार्यपद्धतीवरहीप्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एकूणच, ‘हर घर नल से जल’ ही महत्त्वाकांक्षी योजना प्रभावी अंमलबजावणीअभावी उद्दिष्टांपासून दूर जात असून, भंडारा जिल्ह्यात ती अंधारात हरवत चालल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.