गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : शहरातील संत कबीर वॉर्ड, चांदणी चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे अत्यंत दूषित, काळसर व चिखलमिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील नागरिकांनी पाण्याचे फोटो व नमुने दाखवत हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा आरोप केला आहे. अशा पाण्यामुळे पोटाचे विकार, कावीळ, टायफॉईड, अतिसार यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, १४ व १५ जुलै रोजी शास्त्री चौक येथील नवीन जलवाहिनी व पाणी टाकी स्वच्छतेच्या कामासाठी नगरपरिषदेकडून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.
नागरिकांनी सहकार्य करत दोन दिवस गैरसोय सहन केली. मात्र टाकी स्वच्छ करून अनेक दिवस उलटल्यानंतरही नळातून स्वच्छ पाण्याऐवजी काळसर, गढूळ व चिखलयुक्त पाणी येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांचा संताप आणखी वाढला असून, टाकी स्वच्छतेवर खर्च करूनही नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नसेल तर त्या कामाचा नेमका उपयोग काय? असा सवाल उपस्थित होत आहे. लोकांच्या आरोग्याशी संबंधित इतक्या गंभीर प्रश्नाकडे नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची भावना परिसरात आहे.
नगरपरिषद प्रशासनावर टीका पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे ही नगरपरिषदेची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र दूषित पाणीपुरवठा सुरू असतानाही तातडीने उपाययोजना होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाºया अशा निष्काळजीपणाला कोण जबाबदार, असा सवाल उपस्थित होत आहे. केवळ कागदोपत्री स्वच्छता मोहीम राबवून प्रत्यक्षात दूषित पाणीपुरवठा होत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर मानली पाहिजे.
नागरिकांची मागणी चांदणी चौक परिसरातील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे दूषित पाणीपुरवठा तात्काळ बंद करून स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू करावा. पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा. दूषित पाणीपुरवठ्याचे नेमके कारण शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करावी. संबंधित अधिकारी व जबाबदार कर्मचाºयांची चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असून, नगरपरिषद प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन ठोस पावले उचलली नाहीत, तर भविष्यात नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.