भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ भंडारा शहरात गुरुवारी विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक- राजकीय संघटनांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. दसरा मैदानातून निघालेला निषेध मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हातात फलक, तोंडी घोषणाबाजी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी विरोधातील रोष अशा वातावरणात निघालेल्या या मोर्चाने शहराचे लक्ष वेधून घेतले. हातात तिरंगा घेऊन निघालेल्या या मोर्चात सहभागींनी ‘वंदे मातरमं’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘संविधान जिंदाबाद’, अशा घोषणा दिल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज,सोनम वांगचुक यांच्याही प्रतीमा काही युवकांनी सोबत आणल्या होत्या. आपली प्रतिष्ठाने व दुकाने बंद ठेऊन मोर्चाला पाठिंबा देण्याचे आवाहन हे विद्यार्थी करीत होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन व्यापाºयांनी प्रतिष्ठाने काही काळासाठी बंदही केली. मात्र नंतर काही वेळातच ती पुन्हा सुरूही केली. आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी लावून धरली. केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणांवर टीका करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाºयांना पाठीशी घालू नये, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. यावेळी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर करण्यात आले. विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करत परीक्षापद्धती अधिक पारदर्शक करण्याची गरज अधोरेखित केली. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांचा बंदोबस्तही तगडा होता. शहरातून निघालेल्या मोर्चादरम्यान महात्मा गांधी चौक ते त्रीमूर्ती चौकातील वाहतूक थांबविण्यात आली होती. आंदोलनाच्या शेवटी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. देशातील परीक्षापद्धती अधिक विश्वासार्ह करणे, पेपरफुटीच्या घटनांवर कायमस्वरूपी लगाम घालणे, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करणे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा अन्याय थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.