भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतून आयोजित ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’ कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. ४ जुलै रोजी दुपारी ३.०० वाजता करण्यात आले आहे. गोसंवर्धन, देशी गोवंशाचे संरक्षण, गोआधारित शेती, सेंद्रिय शेतीचा प्रसार तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, जिल्ह्यातील शेतकरी, गोपालक, पशुपालक आणि गोशाळा व्यवस्थापकांसाठी तो मार्गदर्शक ठरणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी राज्याचे पालकमंत्री पंकज भोयर, खासदार प्रशांत पडोळे, आमदार परिणय फुके, आमदार अविनाश ब्राह्मणकर, आमदार नाना पटोले, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजूभाऊ कारेमोरे, नगराध्यक्ष मधुरा मदनकर, जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, माजी खासदार सुनील मेंढे, जिल्हाधिकारी सावंत कुमार, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा मिलिंद कुमार साळवे तसेच गोविज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापारचे कोषाध्यक्ष संजय एकापुरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमामध्ये गोसंवर्धनाचे महत्त्व, देशी गोवंशाच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना, गोआधारित नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे फायदे, गोपालनातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना तसेच शाश्वत कृषी विकासाच्या विविध पैलूंवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या संवाद यात्रेचे आयोजन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, भंडारा, गोशाळा महासंघ तसेच महा एनजीओ फेडरेशन, भंडारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गोपालक, शेतकरी, गोशाळा संचालक, पशुपालक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संवाद यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.