भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा-बघेडा : तुमसर तालुक्यातील गर्रा-बघेडा येथे मनरेगा अंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरींचे अनुदानाचे पैसे अद्याप लाभार्थी शेतकºयांना मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विहिरींचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अनेक लाभार्थ्यांनी इकडूनतिकडून कर्ज काढून खर्च भागविला. मात्र, बांधकाम पूर्ण होऊनही संबंधित रक्कम मिळत नसल्याने लाभार्थ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतकºयांच्या म्हणण्यानुसार, विहिरींच्या बांधकामासाठी आवश्यक असलेला खर्च वेळेवर उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे बांधकाम पूर्ण करण्यासाठी खासगी कर्ज घेऊन तसेच उसनवारी करून पैशांची व्यवस्था करावी लागली. विहिरींचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही शासनाकडून मिळणारी रक्कम अद्याप खात्यावर जमा झालेली नाही.
योजना बदलल्याचे अधिकाºयांकडून उत्तर
अनुदानाच्या रकमेबाबत लाभार्थी संबंधित विभागाकडे वारंवार चौकशी करीत आहेत. मात्र, मनरेगा योजना वगळून आता विहिरींची योजना ‘जी. रामजी’ योजनेत बदलण्यात आल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. योजना बदलून काही महिने उलटूनही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नसल्याने शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शेतीचा खर्च भागविणे झाले कठीण
सध्या खरीप हंगामातील शेतीची कामे सुरू असल्याने शेतकºयांवर रोवणी, औषध फवारणी, रासायनिक खते, मजुरी तसेच इतर शेती कामांचा मोठा खर्च आहे. मात्र, विहिरीच्या बांधकामासाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे आणि त्याचबरोबर शेतीचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न लाभार्थी शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. शासनाने व संबंधित विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन रखडलेले विहिरींचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करावे, अशी मागणी गर्राबघेडा येथील लाभार्थी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.