
भंडारा पत्रिका प्रतिनिधी भंडारा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीबारावीचे निकाल विक्रमी वेगाने जाहीर केले असले तरी विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. दहावीचा निकाल ८ मे रोजी जाहीर होऊन १० दिवसांहून अधिक कालावधी उलटला तरी विद्यार्थ्यांच्या हातात मूळ गुणपत्रिका पोहोचलेल्या नाहीत. बारावीचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला होता. मात्र विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका २५ मे नंतर मिळाल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांना अद्यापही गुणपत्रिकांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
दरम्यान, २९ मे रोजी अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्याने प्रवेशासाठीआवश्यक असलेली मूळ गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) नसल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक विद्यार्थी अलॉटमेंट लेटर घेऊन महाविद्यालयात प्रवेशासाठी गेले असता त्यांच्याकडे मूळ कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र बोर्डाकडून गुणपत्रिकान आल्याने शाळांकडून टीसीही देण्यात आलेली नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने दहावीची गुणपत्रिका आणि टीसी अनिवार्य करू नयेत, असे निर्देश कनिष्ठ महाविद्यालयांना दिले आहेत. शिक्षकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना अजार्चा दुसरा भाग भरण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. बोर्डाचे संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्याने अनेक वेळा मुदतवाढ द्यावी लागली. परिणामी २० मे रोजी अपेक्षित असलेली पहिली प्रवेश यादी तब्बल नऊ दिवस उशिरा २९ मे रोजी जाहीर करण्यात आली.