‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानासाठी सूक्ष्म नियोजन करा

सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश; प्रतिबंधनात्मक उपाययोजनांवर भर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

भंडारा : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीपकुमार गर्जबिये यांनी दिले.

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान कार्यशाळा जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन, विभागीय समन्वय, लोकसहभाग आणि प्रतिबंधनात्मक आरोग्य उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीपकुमार गर्जबिये, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनोषा साकोडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन चकापण, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. अजिंक्य आंबेकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी अनिल बनकर, कार्यक्रम अधिकारी रजनी गर्जबिये, लीलाधर पातले यांच्यासह तालुकास्तरीय गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आशा वर्कर्स, गटप्रवर्तक तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यावर भर

अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी लोकसहभागाला विशेष महत्त्व देण्यात आले. शासनाच्या आरोग्यविषयक योजनांसोबतच विविध विकास योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या वंचित व पात्र घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, त्यासाठी आरोग्य विभागासह ग्रामविकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला व बालविकास तसेच इतर संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे यावेळेस स्पष्ट करण्यात आले.

प्रतिबंधनात्मक उपाययोजनांना प्राधान्य

गावातील नागरिकांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आजार झाल्यानंतर उपचार करण्याबरोबरच आजार होऊ नयेत यासाठी प्रतिबंधनात्मक उपाययोजनांवर अधिक भर देणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. साथीचे आजार व इतर प्रतिबंधनात्मक आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये नियमित स्वच्छता, सुरक्षित व शुद्ध पाणीपुरवठा, आरोग्य तपासणी, लसीकरण, जनजगृती तसेच आवश्यक आरोग्यविषयक उपाययोजना सातत्याने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

प्रत्येक गावात कृती समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून गावातील आरोग्यविषयक परिस्थिती, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यांचा आढावा घेतला जाणार आहे. पात्र नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळत आहे किंवा नाही, आरोग्यविषयक समस्या कोणत्या आहेत, तसेच प्रतिबंधनात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, यावर कृती समितीच्या माध्यमातून नियमित लक्ष ठेवण्यात येणार आहे.

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गावा पातळीवरील यंत्रणा, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यांच्यात समन्वय वाढवून लोकसहाभागातून निरोगी व आरोग्यसंपन्न गावाची निर्मिती करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *