
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : एल-निनोच्या सावटामुळे मान्सूनला विदर्भात पोहचायला विलंब होईल, जूनचा शेवटचा किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात तो सक्रिय होईल, अशा सर्व प्रकारचे अंदाज खोटे ठरवत मान्सून अखेर मंगळवार २३ जून रोजीच विदर्भात दाखल झाला. मान्सूनने गडचिरोली आणि चंद्रपूरला अतिशय जोरदार एन्ट्री घेत वर्धा, यवतमाळ, वाशिम व बुलढाणापर्यंत व्यापून घेतले.
या प्रभावात भंडारासह नागपूर जिल्ह्यातही पावसाने जोरात हजेरी लावली. एल-निनोच्या प्रभावाने यंदा मान्सून कमजोर राहिल, असा अंदाज आहे. अशात कोकणापर्यंत ८ जूनलाच पोहचलेला मान्सून गेल्या १५ दिवसांपासून तिथेच खोळंबल्याने महाराष्ट्रावर चिंतेचे ढग जमा झाले होते. मात्र १४ दिवस विलंबाने का होईना, मान्सूनने सोमवारी मुंबई, पुणे, नाशिकसह बराच भाग काबिज केला. दुसरीकडे बंगालच्या उपसागराची शाखा कमजोर पडल्याने विदर्भात पोहचायला आणखी वेळ लागेल, असा अंदाज होता. विदर्भात सरासरी १५ ते १७ जूनपर्यंत मान्सून दाखल होतो, पण गेल्या पाच वर्षात त्याला विलंब होत आहे. यावेळी एलनिनो वर्षामुळे तो पोहचायला जुलैचीप्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज होता. मात्र हा अंदाज खोटा ठरला. सोमवारी गडचिरोलीच्या वेशीवर पोहचलेल्या मान्सूनने २४ तासात वेगाने ९ जिल्ह्यात प्रवेश केला.
सर्व जिल्ह्यात सर्वत्र पाऊस, चंद्रपूरला सर्वाधिक
मान्सूनच्या पावसाने सोमवारीरात्रीच चंद्रपूरला जोरदार धडक दिली. चंद्रपूर शहरात मंगळवारी सकाळपर्यंत सर्वाधिक ७५ मि.मी. पावसाची नोंद झाली. यासह बुलढाणा ५८ मि.मी., नागपूर २८.४ मि.मी. गडचिरोलीत २४.६ मि.मी. ची नोंद झाली. याशिवाय गोंदिया, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातही मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तशी पहिल्याच दिवशीच्या पावसाने विदर्भातील सर्व जिल्ह्यात सर्वदूर उपस्थिती नोंदवली. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात ५७ मि.मी., अमरावतीच्या वरुड तालुक्यात ३१.३ मि.मी. गोंदियाच्या सालेकसा येथे ३२ मि.मी. व नागपूरच्या नरखेड तालुक्यात ३२.२ मि.मी. ची नोंद झाली आहे. मात्र हवामान विभागाच्या अधिकृत नोंदीनुसार सध्या अकोला, भंडारा, अमरावती, गोंदिया हे सर्व जिल्हे २४ तासात मान्सूनच्या पावसाने व्यापतील, असा अंदाज आहे.
मान्सूनसाठी एमजेओ ठरला अनुकूल
प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरचे वैज्ञानिक डॉ. प्रवीण कुमार यांच्या महाराष्ट्रात सक्रिय झालेल्या मान्सूनसाठी एमजेओची (मॅडन ज्युलियन आॅसिलेशन) प्रणाली कारणीभूत ठरली आहे. एमजेओ म्हणजे विषुववृत्ताजवळील हिंदी महासागरातून पूर्वेकडे सरकणारे ढग व वाºयांचे जागतिक चक्र आहे. ही प्रणाली दुसºया किंवा तिसºया टप्प्यात सक्रिय असताना महाराष्ट्रात मान्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक वातावरण निर्माण झाले. याशिवाय, पश्चिमेकडून वाहणारे दमदार वारे तसेच दक्षिण आफ्रिकेच्या सोमालिया किनारपट्टीकडून येणाºया मान्सून प्रवाहाची स्थितीही सध्या अनुकूल आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्द्रता भारताकडे खेचली जात असून, विदर्भात मान्सूनसाठी पोषक ठरल्याची माहिती डॉ. प्रवीण कुमार यांनी दिली.