मोहुर्ले यांचा देहदानाचा संकल्प; वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी देहदानाचा निर्णय

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

भंडारा : समाजहिताची जाणीव आणि वैद्यकीय शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने भंडारा शहरातील माधव नगर, राणी लक्ष्मीबाई वॉर्ड, खात रोड येथील रहिवासी वासुदेव मादुगुजी मोहुर्ले (वय ६९) यांनी मरणोत्तर देहदानाचा प्रेरणादायी संकल्प केला आहे. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडारा येथे मरणोत्तर देहदानासाठी संकल्पपत्र भरून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

मरणोत्तर देहदान हे वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीररचनेचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी देहदानाचा मोठा उपयोग होतो. त्यामुळे भविष्यातील डॉक्टरांचे ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत होऊन समाजाला दर्जादार वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मदत होते.

‘मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडावे’ हा मानवतावादी संदेश मोहुर्ले यांच्या या संकल्पातून मिळतो. देहदानाचा निर्णय हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि भावी पिढीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी दिलेले अमूल्य योगदान आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुजाता दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे वरिष्ठ समाजसेवा अधीक्षक व ऑर्गन ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर अरविंद शंभरकर यांनी मोहुर्ले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याकडून देहदानाचे संकल्पपत्र स्वीकारले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडारा प्रशासनाच्या वतीने मरणोत्तर देहदानाचा संकल्प केल्याबद्दल वासुदेव मादुगुजी मोहुर्ले यांचे अभिनंदन करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *