भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : २६ वर्षीय युवकाने वडिलांकडून पैसे न मिळाल्याने घरातील स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १५ आॅगस्ट रोजी तिरोडा येथे घडली. ठाकूर मोहल्ला, तिरोडा येथील दिवारू उके यांनी तिरोडा पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने ते १५ आॅगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास पत्नीसह औषध आणण्यासाठी घराबाहेर गेले होते. त्यावेळी त्यांचा २६ वर्षीय मुलगा मयूर उके हा घरी एकटाच होता. मयूरला आॅनलाइन गेमिंगचा नाद असल्याने गेममध्ये पैसे हरल्यानंतर तो वडिलांकडे पैशांची मागणी करीत होता. दुपारी उके दाम्पत्य घरी परतल्यानंतर मयूरने घरातील स्वयंपाकघराच्या सिलिंगला असलेल्या हुकला काळ्या रंगाची दोरी बांधून गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत तातडीने तिरोडा पोलिसांना माहिती देण्यात आली.माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमित वानखडे, हवालदार सुनील नामूर्ती व पोलीस शिपाई मोहित चौधरी यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तिरोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास हवालदार सुनील नामूर्ती करीत आहेत.