युवा शेतकऱ्यांनी कृषी उद्योगाकडे वळावे – जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

भंडारा : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायाबाबत नवीन पिढीमध्ये उदासीनता निर्माण होत असली, तरी पारंपारिक शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन कृषी क्षेत्रात उद्योग उभारल्यास युवा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक समृद्ध होता येईल. यासाठी युवा शेतकरी मंचाच्या माध्यमातून मार्गदर्शन, कृतीशीलता आणि आव्हानात्मक नवीन प्रयोग करण्याची मानसिकता विकसित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने भंडारा युवा शेतकरी मंचांतर्गत संताजी मंगल कार्यालय येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत युवा शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय, कृषी प्रक्रिया, मूल्यवर्धन, मत्स्यपालन, सेंद्रिय शेती आणि शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक समृद्धी

 

पशुसंवर्धन विभागाचे डॉ. अनिरुद्ध पाठक यांनी दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळीपालन या शेतीपूरक व्यवसायांमधील आधुनिक तंत्रज्ञान तसेच शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.

भंडारा जिल्ह्यातील युवा उद्योजक अनंत इखार यांनी मशरूम उत्पादनाच्या माध्यमातून उभारलेल्या उद्योगाची यशोगाथा सादर केली. दोन लाख रुपयांच्या भांडवलातून सुरू केलेल्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आज दोन कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यांच्या यशस्वी प्रवासाने उपस्थित युवा शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची प्रेरणा दिली.

शासकीय योजनांची माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन

 

जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने उपव्यवस्थापक कुणाल गोंडचर यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत युवकांना उद्योग व रोजगारासाठी प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. कृषी तज्ज्ञ सुधीर धकाते यांनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पादन घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील पल्लवी पाकमोडे यांनी मत्स्यपालन व मत्स्यसंवधनासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. तसेच माशांपासून लोणचे आणि इतर व्यावसायिक उत्पादने तयार करून त्यांची विक्री करण्याच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हा संसाधन व्यक्ती व प्रशिक्षक योगराज वाघमारे यांनी कृषी प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि शेतमाल विक्री व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

नवीन प्रयोगांसाठी युवा शेतकरी मंचाची भूमिका महत्त्वाची

 

युवा शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करावेत, कृषी प्रक्रिया उद्योग उभारावेत आणि शेतमालाला मूल्यवर्धनाची जोड द्यावी, या उद्देशाने भंडारा युवा शेतकरी मंचाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता माने यांनी केले. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक वर्षा चिखलते, विभागीय कृषी अधिकारी पदमाकर गिधमारे, उपविभागीय कृषी अधिकारी किशोर पात्रोकर आणि जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व युवा शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन कृषी अधिकारी वृषाली देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन कृषी अधिकारी प्रगती शेळके यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *