लाचखोर पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यावर गुन्हा

■ अटकेच्या भीतीने पोलीसच फरार ■ एकावर यापूर्वीही कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

भंडारा : दाखल झालेल्या अदखलपात्र गुन्ह्यात तडजोड करून प्रकरण मिटवून देण्यासाठी १० हजाराच्या लाचेची मागणी करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक रमेश खाडे आणि शिपाई रविकुमार आडे यांच्यावर भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही लाचखोर भंडारा पोलीस ठाण्यात कार्यरत असून सध्या फरार आहेत. पोलिसांकडून शोध सुरू आहे. विशेष म्हणजे खाडे यांच्या विरोधातील ही तिसरी कारवाई असल्याचे समजते. यापूर्वी दोनदा लाचलुचपत विभागाने कारवाई केल्याची माहिती आहे. भंडारा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक रमेश संपतराव खाडे, वय ३८ हे काही महिन्यापूर्वीच रुजू झाले होते. तर पोलीस शिपाई रवीकुमार बाबुराव आडे, वय ३८ हे भंडारा ठाण्यातच कार्यरत आहेत.

भंडारा पोलीस ठाण्यात दाखल एका अदखलपात्र गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी लाच मागितली गेली. एका २६ वर्षीय तक्रारदाराच्या विरोधात दाखल गुन्हा सौम्य करून मिटविण्यासाठी आधी १० हजार रुपये लागतील, असे सांगण्यात आले. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने २४ सप्टेंबर २०२६ रोजी तक्रार केली. त्याच दिवशी पोलीस स्टेशन भंडारा येथे पडताळणी कारवाई करण्यात आली. त्यात शिपाई आडे याने तक्रारदाराशी बोलणी केल्यानंतर आरोपी एपीआय खाडे यांच्या मोबाईलवर तक्रारदाराचे बोलणे करून दिले आणि १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. खाडे यांनी आडे यांना लाचेच्या मागणीस प्रोत्साहन दिल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. दि. ३० सप्टेंबर रोजी सापळा कारवाई आयोजित करण्यात आली होती, मात्र दोन्ही आरोपींना कारवाईचा संशय आल्याने ते तक्रारदाराला भेटले नाहीत. मात्र पडताळणीवेळी १० हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने दोन्ही आरोपीं विरुद्ध पोलीस स्टेशन भंडारा येथे अपराध क्रमांक २०३९/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७, १२ प्रमाणे गुन्हा दि. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.२१ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही आरोपी फरार असून आरोपींचा शोध सुरू आहे. विशेष सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे यांच्याविरुद्ध यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागांतर्गत दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. एक कारवाई तर परिविक्षाधीन कालावधीतच झाल्याचे समजते.

ही कारवाई पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर, माधुरी बावीसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, तपास अधिकारी नितेश देशमुख, पथकातील पोहवा मिथुन चदिवार, अतुल मेश्राम, पोलीस शिपाई विष्णू वरठी, सुमेध रामटेके यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *