लोधीटोल्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : शहरालगत असलेल्या लोधीटोला गावात गेल्या काही दिवसांपासून महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावचे सरपंच आणि त्यांच्या सहकाºयांकडून दहशतीचे वातावरण निर्माण करून महिलांशी असभ्य वर्तन, अश्लील चाळे, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे गंभीर आरोप गावातील महिलांनी केले आहेत. स्थानिक शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत महिलांनी आपली व्यथा माध्यमांसमोर मांडली. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून सरपंचपदावर असलेले संजय बंशीलाल ठाकरे यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या कामाबाबत जाब विचारला असता त्यांच्याकडून महिलांशी वाद घालणे, असभ्य भाषा वापरणे आणि अश्लील वर्तन केले जात असल्याचा आरोप महिलांनी केला. महिलांच्या म्हणण्यानुसार, सरपंचाचे मुलगे रितिक संजय ठाकरे, गुंजन संजय ठाकरे आणि सहकारी विकेश भैयाल गावराने हे देखील रस्त्यावरून जाणाºया महिला-मुलींना पाहून अश्लील भाषेत बोलतात. त्यामुळे गावातून ये-जा करताना महिलांना भीती वाटत आहे. ७ आॅगस्ट रोजी एका महिलेसोबत वाद झाल्यानंतर तिला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. यावेळी संबंधित व्यक्तीने महिलेसमोर अश्लील पद्धतीने निर्वस्त्र होऊन तिचा विनयभंग केल्याचा अत्यंत गंभीर आरोपही करण्यात आला आहे. महिला पोलिस पाटलांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा महिलांनी केला. याप्रकरणी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, घटनेला१० दिवस उलटूनही आरोपीला अटक झालेली नसल्याने महिलांमध्ये नाराजी आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *