शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्नशील : आ. सुधाकर अडबाले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधि
भंडारा : राज्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी मी व आमदार ॲड. अभिजीत वंजारी सातत्याने सभागृहात व सभागृहाबाहेर प्रयत्नरत आहोत. पुढे देखील शिक्षकांच्या विविध समस्या व प्रलंबित मागण्यांसाठी सातत्याने प्रयत्न करण्याची ग्वाही विमाशिस संघाचे सहकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी दिली. समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान केल्याने त्यांना नवीन ऊर्जा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, गोविंदराव वंजारी फाउंडेशन तसेच गोविंद मैना फाउंडेशन यांच्या वतीने माजी आमदार स्वर्गीय ना. बा. सपाटे व स्वर्गीय दत्तात्रेय मिर्झापुरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भंडारा येथे ‘सन्मान कर्तृत्वाचा – उत्कृष्ट शिक्षक सन्मान सोहळ्या २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. हेमंत सेलिब्रेशन, भंडारा येथे रविवारी दुपारी १२ वाजता झालेल्या या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्था चालक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यरांचा गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणादरम्यान आमदार अडबाले बोलत होते.

कार्रक्रमाच्या अध्यक्षस्थानी विमाशिस संघाचे सहकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले होते. आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रमुख అతిथी म्हणून माजी शिक्षक आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तयवाडे, सत्कारमूर्ती राजारामजी शुक्ला, होमराज कापगते तसेच शिक्षणाधिकारी (माध्य.) श्री. सोनटक्के, गोविंद मैना फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. सीमा अडबाले, सचिव राहुल अडबाले तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्यात विदर्भ शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष राजाराम शुक्ला, विमाशिस संघाचे भंडारा जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष होमराज कागपते यांना जीवनगौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. यानंतर नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्था चालक अशा एकूण ११८ सत्कारमूर्तीना मान्यरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *