शेताच्या कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू : घातपाताचा संशय ?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात शेतातील तारेच्या कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृत बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत वनविभागाकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अंदाजे १६ महिन्याचा हा बिबट्या शेतातील तारेच्या कुंपणात अडकला होता. कुंपणातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र, बिबट्याच्या मृत्यूमागे मानवी हस्तक्षेप किंवा घातपाताची शक्यता आहे का, याचीही तपास वनविभागाकडून केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थल दाखल झाले. अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला आहे.

मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येणार असून, त्याचा अहवाल आल्ग्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी आकरे यांनी घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे वनविभागाच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कुंपणामध्ये बिबट्या नेमका कसा अडकला, त्याला काही इजा झाली होती का, तसेच या घटनेत मानवी हस्तक्षेप होता का, या सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. वन्यजीवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या घटनेने पुन्हा एकदा शेталगतच्या तारेच्या कुंपणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चौकशी आणि शवविच्छेदन अहवालातून बिबट्याच्या मृत्यूमागील सत्य समोर येणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *