भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली/सेंदुरवाफा नगरपरिषद क्षेत्रातील संपूर्ण प्रभागांमध्ये रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक तथा गटनेते संदीपभाऊ बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली व नगरसेविका वैशाली लांजेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये रोपे लावून (रोवना करून) नगरपरिषद प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून साकोली शहरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.
यामुळे वाहनचालक, पादचारी, वृद्ध व शाळकरी मुलांचे हाल होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा मागणी करूनही नगरपरिषद प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या अनास्थेचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्डयांमध्ये रोपे लावुन (रोवना करुन) करून घोषणाबाजी केली आणि भविष्यात तीव्र आंदोलना करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी गुंजन फेंडर यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर केले.
शहरातील सर्व प्रभागांतील रस्त्यांची दुरावस्था त्वरित सुधारून खड्डे बुजवावेत, अन्यथा जनतेला सोबत घेऊन याहून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गटनेते संदीपभाऊ बावनकुळे यांनी यावेळी दिला. आंदोलनातील प्रमुख उपस्थितीमध्ये नगरसेविका वैशाली लांजेवार, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत शामकुवर, युवक काँग्रेसचे शहर सचिव आकाश मेश्राम, सुरेश फुंडे सर, रणजीत चव्हाण, खांडवाये सर, भूपेश तरोणे, झनकभाऊ लांजेवार यांच्यासह प्रभागातील नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.