महिलांच्या सतर्कतेमुळे वनविभागाला माहिती
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अवशेष तपासणीसाठी सीलबंद
भंडारा पत्रिका/वार्ताहर
गरा-बघेड़ा : नाकातोंडगरी वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र चिचोली दक्षिण नियत क्षेत्र पवनीारा अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय वन कक्ष क्रमांक ३६४, प्रेषीदेव पहाडी साखळी परिसरात बिबट्याच्या छव्याचा मृतदेह आढळून आला. मौजा साखळी येथील काही महिला जळाऊ सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या असता त्यांना दुर्गंधी जाणवली. त्यांनी दुर्गंधीच्या दिशेने पाहणी केली असता बिबट्याचा छवा मृतावस्थेत आढळून आला.
महिलांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तातडीने याची माहिती नजीकच्या वनविभाгаच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला.
सायंकाळची वेळ झाल्याने पुढील कार्यवाही दुसऱ्या दिवशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव रक्षक यांचे प्रतिनिधी, पंच तसेच वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत पुन्हा घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला.
मृत बिबट्याचा छवा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी घटनास्थळावरून आवश्यक अवशेष गोळा करून ते सीलबंद केले. हे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, मृत वन्यप्राण्याची अवस्था अत्यंत कुजलेली असल्याने एसओपीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घटनास्थळाचे दहन करून उर्वरित अवशेषांचा नियमानुसार निपटारा करण्यात आला. प्राथमिक अंदाजानुसार बिबट्याचा छवा सुमारे एक महिन्यापासून मृत अवस्थेत असावा, असा अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र मृत्यूचे निश्चित कारण प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
ही कारवाई प्रकाश निष्कासन अधिकारी तथा सहायक उपवनसंरक्षक भंडारा रितेश भोंगडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम थोरात, डॉ. आशिफ गटकल, एनजीओचे अधिकारी शाहिद खान व अझर पाशा, महसूल विभागाचे अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी तुमसर सी. जी. राहांगडाले, नाकातोंडगरी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामटेके, क्षेत्र सहायक टि. एच. घुले, बीत रक्षक आर. टी. अंजाड, पवनीारा बीटचे ओ. एन. मोरे, वनरक्षक दीपक उईके, बायोलाॉजिस्ट शुभम मोदनफर तसेच इतर वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
उपवनसंरक्षक भंडारा योगेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली असून बिबट्याच्या छव्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.