भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सालेकसा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला असताना अशाच एका बिकट परिस्थितीत सालेकसा तालुक्यातील आरोग्य विभागाच्या पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे एका गरोदर मातेचा आणि बाळाचा जीव वाचला आहे. या कामगिरीचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे. ही घटना सालेकसा तालुक्यातील भजेपार गावातील आहे. भजेपार गाव प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव अंतर्गत येते.
गावातील रस्ते पाण्याखाली गेल्याने बाहेरचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. अशा वेळी गावातील एका गरोदर मातेची प्रकृती अचानक बिघडली. तिला तातडीने रुग्णालयात नेणे सालेकसाच्या भजेपार येथील गरोदर मातेला सुखरूप स्थलांतर आवश्यक होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी तात्काळ सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यमान आरोग्य मंदिर भजेपार येथील वैद्यकीय पथकाने कोणतीही दिरंगाई न करता मदतकार्य सुरू केले. पूरग्रस्त भागात पाणी तुडवत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश कटरे, आरोग्य सेविका कु. विद्या बहेकार आणि आशा स्वयंसेविका श्रीमती विनूताई खांडवाये या तिघी थेट भजेपार गावात पोहोचल्या. पाण्याचा धोका, निसरडे रस्ते आणि प्रतिकूल हवामान असतानाही पथकाने अत्यंत काळजीपूर्वक गरोदर मातेला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.