भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील सुंदरी येथे मंगळवार (दि. २८ जुलै) रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास शतकाहून जुनी व जीर्ण झालेली खाजगी बोळी अचानक फुटल्याने परिसरातील शेतकºयांच्या धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत योगेंद्र अभिमान छोडे यांच्या जवळपास एक ते दीड एकर क्षेत्रातील धान पीक पाण्याच्या प्रचंड प्रवाहात पूर्णत: वाहून गेले असून सुमारे चार ते पाच हेक्टर क्षेत्रातील लागवड केलेल्या धान पिकांना मोठा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच जवळपास १२ खातेदार शेतकºयांच्या १२ ते १५ एकर क्षेत्रातील धान पिके नुकसानग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार निलेश कदम, तलाठी एम. एन. मरसकोल्हे, तालुका कृषी अधिकारी आदित्य घोगरे, कृषी सहाय्यक दुर्गाप्रसाद भोंडे, पाटबंधारे विभागाचे जितेंद्र दिघोरे तसेच ग्रामसेवक पी. एम. झोडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व नुकसानीचा आढावा सुरू केला आहे. प्राप्त माहितीनुसार, सुंदरी गावातील गट क्रमांक ४८ व ४९ मधील सुमारे ३.१२ हेक्टर क्षेत्राला लाभदायी ठरणारी ही खाजगी बोळी सन १८९० च्या सुमारास बांधण्यात आली होती. कालांतराने तिची संरचना अत्यंत जीर्ण व धोकादायक बनली होती. मात्र वेळेत दुरुस्ती अथवा मजबुतीकरण न झाल्याने अखेर पहाटेच्या वेळी बोळीची पार अचानक फुटली आणि प्रचंड वेगाने बाहेर पडलेल्या पाण्याने खालच्या भागातील शेतांमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला. या अनपेक्षित दुर्घटनेमुळे अनेक शेतकºयांचे मेहनतीने जोपासलेले धान पीक पाण्याखाली गेले. काही ठिकाणी रोपे पूर्णपणे वाहून गेली असून अनेक शेतांमध्ये गाळ साचला आहे. शेतांच्या बांधांना तडे गेले असून पाण्याच्या प्रवाहामुळे शेतीची मातीही वाहून गेल्याने पुढील लागवडीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषत: योगेंद्रअभिमान झोडे यांचे एक ते दीड एकर क्षेत्रातील धान पीक पूर्णत: उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. घटनेनंतर परिसरातील शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नुकसानग्रस्त शेतकºयांनी शासनाकडून तातडीची आर्थिक मदत, विशेष अनुदान व पीक नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या या मोठ्या नुकसानीमुळे अनेक शेतकºयांचे संपूर्ण नियोजन विस्कळीत झाले आहे.दरम्यान, महसूल, कृषी व पाटबंधारे विभागाच्या संयुक्त पथकाकडून नुकसानग्रस्त क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत असून प्रत्येक शेतकºयाच्या शेतातील नुकसानीची नोंद घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पाण्याचा प्रवाह ओसरल्यानंतर आणि शेतातील साचलेले पाणी कमी झाल्यानंतर नुकसानीचे अचूक चित्र स्पष्ट होणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. पंचनामा अहवालाच्या आधारे शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. सुंदरी येथील ही घटना केवळ एका बोळीच्या फुटण्यापुरती मर्यादित नसून ग्रामीण भागातील जुन्या व जीर्ण जलसाठा संरचनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी ठरली आहे. अशा धोकादायक स्थितीत असलेल्या बोळी, तलाव व बंधाºयांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर शेती व मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती स्थानिक शेतकºयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.