भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील कवडसी फाटा येथील सॅन्डी किचन अॅन्ड रेस्टॉरेंटवर पोलिसांनी धाड टाकुन अवैधरित्या साठवणुक केलेला विदेशी दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी भंडारा येथील वाईन शॉपी मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप सुधाकर चन्ने (वय ३९), संदीप सुरेश कृपाण (वय ४१, रा. गांधी वार्ड, शहापूर; सध्या रा. सीताराम सिटी, भोजापूर) आणि सरगम वाईन शॉपी, भंडारा येथील मालक मयुरेश अनिल पंचबुद्दे (वय ३०, रा. सहकारनगर, भंडारा) यांच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस हवालदार राऊत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीसांनी कवडसी फाटा येथील सॅन्डी किचन अॅन्ड रेस्टॉरंटमध्ये धाड टाकुन तपासणी केली असता विना परवाना विविध ब्रँडची विदेशी दारू साठवून ठेवल्याचे आढळून आले.
या कारवाईत ३७ हजार २९५ रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. तसेच दारू ठेवण्यासाठी वापरण्यात आलेला पेप्सी कंपनीचा ७० हजार रुपये किमतीचा फ्रिज आणि सहा हजार रुपये किमतीचे लोखंडी कपाटही पोलिसांनी जप्त केले. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख १३ हजार २९५ रुपये आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सरगम वाईन शॉपी, भंडारा येथील मालक मयुरेश अनिल पंचबुद्दे यांनी आपल्या वाईन शॉपीमधून संबंधित आरोपींना दारू विक्रीचा किंवा पुरवठ्याचा आवश्यक परवाना नसतानाही मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ४३७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(ई) आणि ८३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तेजस सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राऊत व पोलीस हवालदार बुरडे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.