सोनमाळा वनक्षेत्रात आढळले बिबट्याचे दोन शावक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : लाखनी वनक्षेत्रांतर्गत सोनमाळा गावाजवळील वनक्षेत्रात दोन बिबट्याचे शावक आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहिती नुसार, या शावकांची आई त्यांना वनक्षेत्रातील एका सुरक्षित ठिकाणी सोडून गेल्याचे निदर्शनास आले असून, वन विभागाला माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेण्यात आली. वन विभागाने शावकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक उपाययोजना राबवत त्यांचे रेस्क्यू केले असून, वन अधिकारी व कर्मचाºयांकडून त्यांच्यावर चोवीस तास लक्ष ठेवण्यात येत आहे. सदर दोन्ही शावके अंदाजे एक ते दीड महिन्यांची असून ती सुदृढ अवस्थेत असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. शावकांच्या आईचा शोध घेण्याबरोबरच ती पुन्हा आपल्या पिल्लांकडे परत येण्याची शक्यता लक्षात घेऊन वन विभागाने संपूर्ण परिसरात विशेष दक्षता बाळगली आहे.

शावकांना कोणताही त्रास होऊ नये, तसेच त्यांच्या नैसर्गिक अधिवासात कोणताही मानवी हस्तक्षेप होऊ नये यासाठी वन विभागाने सोनमाळा, मिरेगाव व लगतच्या गावांमध्ये दवंडी पिटवून नागरिकांना त्या परिसरात जाण्यास सक्त मनाई केली आहे. वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शावके पाहण्यासाठी गर्दी करू नये, छायाचित्रण किंवा व्हिडिओ चित्रीकरणासाठी घटनास्थळी जाऊ नये तसेच सोशल मीडियावर अफवा पसरविणे टाळावे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असून, कोणालाही शावक अथवा बिबट्याची हालचाल आढळल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा. या घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक (डीसीएफ) योगेंद्रसिंग, सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) संजय मेंढे तसेच क्षेत्रीय वन अधिकारी (आरएफओ) धनविजय यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित अधिकाºयांनी वन कर्मचारी व बचाव पथकाला आवश्यक त्या सूचना देत शावकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, वन विभागाच्या सतर्कतेमुळे दोन्ही बिबट्याचे शावक सुरक्षित असून, त्यांच्या आईची प्रतीक्षा करण्यात येत आहे. वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, नागरिकांनी संयम व जबाबदारीचे भान राखून वन विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *