◆ धान उत्पादक शेतकरी हवालदिल ◆ संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
भंडारा : वर्षभर कष्ट करून उभे केलेले धानाचे पीक डोळ्यांसमोर करपताना पाहण्याची वेळ भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील तीव्र बदल, दमटपणा आणि पावसाचे सावट यामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये धान पिकावर तुडतुडे (ब्राउन प्लँट हॉपर), खोडकीड आणि लष्करी अळीने मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे. काही भागात तर अवघ्या दोन-तीन दिवसांत हिरवीगार शेते पांढरी-तपकिरी पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने अक्षरशः जळून खाक झाली आहेत.
धान हेच भंडारा जिल्ह्यातील हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. याच पिकाच्या भरवशावर मुलांचे शिक्षण, घरखर्च, लग्नकार्य, आरोग्याचा खर्च आणि बँकेचे कर्ज फेडण्याची आशा शेतकरी बाळगून असतो, मात्र यंदा ऐन पिकाच्या महत्वाच्या टप्प्यावर किडीने घात केला आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.
दोन दिवसांत हिरवे शेत झाले पांढरे
तुडतुड्यांचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी इतका तीव्र आहे की, किडीने पिकातील रस शोषून घेतल्याने रोपे करपून गेली आहेत. स्थानिक पातळीवर या नुकसानीला ‘हॉपर बर्न’ म्हटले जाते. काही शेतांमध्ये लोंब्यांमध्ये दाणे भरण्याऐवजी पोच निर्माण झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
एकेकाळी एकरी २० ते २५ पोती धानाचे उत्पादन देणाऱ्या सुपीक जमिनी आज ओस-डिस झाल्यासारख्या दिसत आहेत. काही शेतांमध्ये पीक काढण्याचा खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
औषधांच्या फवारणीत पैसा गेला; तरीही पीक वाचले नाही
किडीचा प्रादुर्भाव दिसताच शेतकऱ्यांनी आपल्या परीने उपाययोजना सुरू केल्या. अनेकांनी बँकांचे कर्ज घेतले, तर काहींनी सावकारांकडून पैसे उधार घेऊन महागडी कीटकनाशके खरेदी केली. दोन-तीन वेळा फवारण्या करूनही अपेक्षित परिणाम न आल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाढतच गेला. बियाणे, खते, मजुरी, औषध फवारणी यावर हजारो रुपये खर्च केल्यानंतरही अखेर पीक हातातून निसटत असल्याने शेतकऱ्यांसमोर आता मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
आता मुलांचे शिक्षण आणि कर्ज कसे फेडायचे?
भंडारा तालुक्यातील सिललो येथील एका बाधित शेतकऱ्याने आपली व्यथा सांगताना डोळ्यातील अश्रू सावरत म्हटले, ‘धानाचे पीक यंदा खूप चांगले आले होते. वर्षभराची सगळी स्वप्ने या पिकावर होती. पण आठ-वड्याभरात तुडतुड्याने अख्खे शेत फस्त केले. आता घर कसे चालवायचे, मुलांचे शिक्षण कसे करायचे आणि बँकेचे कर्ज कसे फेडायचे, काहीच समजत नाही.’
ही केवळ एका शेतकऱ्याची व्यथा नसून जिल्ह्यातील हजारो धान उत्पादकांच्या घराघरातील परिस्थिती असल्याचे चित्र आहे.
पंचनामे कागदावर नको, बांधावर करा
या संकटाची तातडीने दखल घेऊन जिल्हा प्रशासन, कृषी विभाग आणि महसूल विभागाने संयुक्त पथके तयार करावीत. अधिकाऱ्यांनी गावागावांत प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करावी आणि वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी व लोकप्रतिनिधींकडून होत आहे.
बाधित क्षेत्राला तात्काळ ‘कीडग्रस्त भाग’ घोषित करून प्रतिहेक्टरी भरीव आर्थिक मदत द्यावी, पीक विम्याची भरपाई विनाअट मिळावी आणि यंदाचे शेतकर्ज माफ करावे, अशीही मागणी जोर धरत आहे.
संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी
एका बाजूला किडीचा प्रादुर्भाव आणि दुसऱ्या बाजूला पिकाच्या उत्पादनाबाबत निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
वर्षभर मातीशी झुंज देऊन उभे केलेले धानाचे पीक काही दिवसांत किडीने हिरावून घेतले. शेतकऱ्यांच्या शेतात आता केवळ करपलेले पीक नाही, तर मोडलेली स्वप्ने आणि वाढत्या कर्जाची चिंता दिसत आहे. त्यामुळे शासनाच्या मदतीकडे हजारो शेतकरी आशेने डोळे लावून बसले आहेत.