भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- महाराष्ट्रात आॅटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयानंतर आता सीमावर्ती गोंदिया जिल्ह्यात या नियमावरून संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने आॅटो आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर १७ आॅगस्टपासून नियमांची अंमलबजावणी आणि कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील आॅटोचालक संघटनांनी हिंदी भाषेत संवाद साधल्याबद्दल प्रशासनाने कारवाई करू नये, अशी मागणी केली आहे. गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांची सीमा लागून आहे. त्यामुळे या जिल्ह्यात हिंदी भाषिक प्रवाशांची संख्या मोठी आहे. बाहेरून येणाºया प्रवाशांशी संवाद साधताना मराठी भाषेचा वापर केल्यास अनेक प्रवाशांना ती समजत नाही. त्यामुळे प्रवाशांना मार्ग, भाडे किंवा इच्छित ठिकाणाची माहिती देण्यासाठी हिंदीत संवाद साधावा लागतो, अशी भूमिका आॅटोचालकांनी मांडली आहे.
आम्ही मराठी बोललो तर अनेक प्रवाशांना कळत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आम्हाला हिंदीत बोलावे लागते. हिंदीत संवाद साधल्या मुळे प्रशासनाने आमच्यावर कारवाई करू नये, अशी मागणी आॅटोचालक संघटनांनी केली आहे. दरम्यान, या मागणीवर गोंदियाचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. गोंदिया जिल्हा पूर्वी मध्यप्रदेशचा भाग होता. त्यामुळे या जिल्ह्याची भाषिक परिस्थिती इतर भागांपेक्षा काहीशी वेगळी आहे. या विषयावर मुंबईला गेल्यानंतर चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे मराठी भाषेचा आग्रह, तर दुसरीकडे सीमावर्ती जिल्ह्यातील हिंदी भाषिक प्रवाशांची गरज, यामुळे गोंदियातील आॅटोचालकांसमोर नवा प्रश्न उभा राहिला आहे. आता राज्य सरकार या दोन्ही बाजूंचा समन्वय साधत नेमका काय निर्णय घेणार, याकडे गोंदियातील आॅटोचालक आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे.