भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : पूर्व विदर्भातील कोहळी समाजावर सातत्याने होत असलेल्या राजकीय उपेक्षेविरोधात आता समाजाने निर्णायक भूमिका घेतल्याचे स्पष्ट संकेत साकोलीत दिसून आले. केंद्रीय कोहळी समाज विकास मंच, नागपूर आणि कोहळी पाटील संघर्ष मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मंगलमूर्ती सभागृहात झालेल्या भव्य मेळाव्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय कोहळी समाज विकास मंचचे अध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी राजकीय पक्षांना थेट इशारा देत, “आम्हाला डावलून निवडणूक जिंकून दाखवाच,” असे जाहीर आव्हान दिले. त्यांच्या या विधानामुळे पूर्व विदर्भाच्या राजकीय वतुर्ळात चर्चांना उधाण आले आहे.
प्रकाश बाळबुद्धे यांनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता भाजपच्या उमेदवारी वाटपावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “कोहळी समाजाच्या नेत्यांची नावे डावलून दोन दिवसांपूर्वी दुसºया पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिली जाते. काही मतदारसंघांत संबंधित समाजाचे अत्यल्प मतदार असतानाही उमेदवारी मिळते; मात्र कोहळी समाजाला प्रत्येकवेळी ‘संख्या कमी’ असल्याचे कारण पुढे करून न्याय नाकारला जातो. हा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही,” असा घणाघात त्यांनी केला. कोहळी पाटील संघर्ष मंचाचे समन्वयक ललित बाळबुद्धे यांनीही राजकीय पक्षांवर तीव्र टीका करत, “कोहळी समाजाला केवळ मतदानापुरते गृहित धरले जाते. समाजातील सुमारे ८० टक्के मतदार भाजपचे पारंपरिक समर्थक असूनही राजकीय प्रतिनिधित्वाच्या बाबतीत समाजाचा वाटा शून्यावर आणला जात आहे. त्यामुळे समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असून आता ‘प्रथम समाज… नंतर पक्ष’ या भूमिकेतून संघटित लढा उभारला जाणार आहे,” असे स्पष्ट केले.
यावेळी भंडारा-गोंदिया व चिमूर-गडचिरोली या दोन लोकसभा तसेच साकोली, तुमसर, अजुर्नी (मोरगाव), चिमूर, ब्रह्मपुरी, बल्लारपूर आणि आरमोरी या सात विधानसभा मतदारसंघांत कोहळी समाज निर्णायक असल्याचा दावा करण्यात आला. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांतील ४०० हून अधिक गावांमध्ये समाजाचे प्रभावी अस्तित्व असल्याचेही सांगण्यात आले.यानंतर मंगलमूर्ती सभागृहात पार पडलेल्या कोहळी समाजाच्या पहिल्याच भव्य मेळाव्याला विक्रमी व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजाच्या एकजुटीचे, स्वाभिमानाचे आणि राजकीय जागृतीचे हे ऐतिहासिक पर्व असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. “आज आपण केवळ मेळावा घेतलेला नाही, तर समाजाच्या उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी मजबूत पाया रचला आहे,” असा विश्वास आयोजकांनी व्यक्त करत सर्व समाजबांधवांचे आभार मानले. पत्रकार परिषदेला ललित बाळबुद्धे, नाना पाटील नाकाडे, अमोल पाटील मुंगमोडे, प्रकाश बाळबुद्धे, प्रणय खुणे, गजानन डोंगरवार, डॉ. श्याम हटवादे यांच्यासह चारही जिल्ह्यांतील कोहळी समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या या आक्रमक भूमिकेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील राजकीय समीकरणांवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची चर्चा सुरू झाली आहे.