भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील गटर लाईन व पाणीपुरवठा पाइपलाईनच्या कामानंतर उखडलेल्या व न बुजविलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर आज (दि. ७ जुलै २०२६) दुपारी सुमारे १२.३० वाजता भंडारा शहरातील युवकांनी एकत्र येत भंडारा नगरपरिषद येथे डीपी/सिटी इंजिनिअर मंगेश लांडे यांना सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी शहरातील विविध भागांतील मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.युवकांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात शहरातील चांदणी चौक ते सामान्य रुग्णालय मार्ग, पोस्ट आॅफिस चौक ते मुस्लिम लायब्ररी चौक, मिस्कीन टँक चौक ते पांडे महल, म्हाडा कॉलनी ते अंबिका नगर, मुस्लिम लायब्ररी चौक ते निर्मिती चौक, मुस्लिम लायब्ररी चौक ते राजीव गांधी चौक तसेच इतर अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे, चिखल व अपूर्ण अवस्थेत सोडलेल्या रस्त्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
या रस्त्यांमुळे वाहनचालक, पादचारी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठनागरिक व रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताची शक्यता वाढल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी गोवर्धन भगवान निनावे यांनी सिटी इंजिनिअर मंगेश लांडे यांच्याशी सविस्तर चर्चा करत शहरातील नागरिकांच्या अडचणी मांडल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना मंगेश लांडे यांनी “येत्या आठ ते दहा दिवसांत शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येईल,” असे आश्वासन दिले. चर्चेदरम्यान गोवर्धन निनावे यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करत विचारले की, गटर व पाणीपुरवठा पाइपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदल्यानंतर ते पूर्ववत करण्याची तरतूद शासनाच्या जीआरमध्ये नव्हती का? यावर सिटी इंजिनिअर मंगेश लांडे यांनी स्पष्ट केले की, पाणीपुरवठा पाइपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांवर सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा आदेश संबंधित जीआरमध्ये नव्हता. मात्र गटर लाईनच्या कामासाठी खोदलेले रस्ते काम पूर्ण झाल्यानंतर बुजवून त्यावर सिमेंट काँक्रीटीकरण करण्याची तरतूद जीआरमध्ये आहे.
यावेळी गोवर्धन निनावे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “आज दिलेल्या निवेदनातील मागण्यांवर पंधरा दिवसांच्या आत कार्यवाही झाली नाही आणि रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली नाही, तर भंडारा शहरातील सर्व युवक नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करतील. या आंदोलनास पूर्णपणे नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील.” शहरातील गंभीर रस्ते समस्येकडे नगरपरिषद प्रशासन, संबंधित अधिकारी तसेच आमदार, खासदार आणि नगराध्यक्ष यांनी तातडीने लक्ष द्यावे व नागरिकांना सुरक्षित, खड्डेमुक्त आणि दजेर्दार रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी युवकांनी केली. निवेदन देताना गोवर्धन भगवान निनावे, भूषण देशमुख, खुशांत ढोकरीमारे, अर्पण गोस्वामी, नंदू उपरीकर, राकेश खेडकर, पवन रघुते, हितेश राम, अक्षय क्षीरसागर, खेमचंद धकाते, लोकेश भुरे, आदित्य चौधरी, यश चिंचोलकर, बंटी गिरीपुंगे, आकाश रहांगडाले, विशाल भुरे तसेच भंडारा शहरातील मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. शहरातील रस्त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा, नागरिकांना दिलासा मिळावा आणि भविष्यात विकासकामांनंतर रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे पार पाडावी, अशी अपेक्षा यावेळी युवकांनी व्यक्त केली.