भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असुन त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याने जिल्हयातील शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी या मागणीसाठी खा. डॉ. प्रशांत पडोळे व जि. प. शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर यांच्या नेतृत्वात आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात शेकडो विद्यार्थ्यांसह पालक वर्ग तसेच जिल्हा परिषदेचे पदाधिकारी,जि.प.सदस्य तसेच अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.यावेळी सरकार विरोधात घोषणा देत महाराष्टÑ राज्याचे शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. शाळेत शिक्षकांची तीव्र कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन ठप्प झाले आहे. अनेक वर्गांना शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असून, संतप्त पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने शाळा बंद ठेवून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आंदोलनकर्त्यांनी शासना विरोधात जोरदार घोषणा देत शिक्षक भरतीची मागणी लावून घरली. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील ८०० ते ९०० शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
जिल्ह्यातील सुमारे ५० शाळा विनाशिक्षकी असून त्यामुळे विद्याथ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित करीत सरकार गोरगरीब विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळत असल्याचा आरोप करीत यापूर्वी याच मागणीसाठी साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाने शिक्षक भरतीबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही भरती प्रक्रिया सुरू न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये नोंदणी केलेल्या धान उत्पादक शेतक-यांना प्रति किंटल किमान एक हजार रुपयांचा बोनस तात्काळ अदा करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांनी हिवाळी अधिवेशनात बोनसची घोषणा केली होती, मात्र अद्याप शेतकºयांच्या खात्यात रकम जमा झालेली नसल्याचे निवेदनात नमूद आहे. जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट मीटरद्वारे अवास्तव वीजबिल आकारणी होत असल्याचा आरोप करत ही आकारणी तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती मागे घेऊन शेतकºयांना दिलासा द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, साकोली, लाखांदूर, लाखनी, पवनी व भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक भंडारा तालुक्यातील मका उत्पादक शेतकºयांना आधारभूत किंमतीवर मका विक्रीची संधी मिळावी यासाठी शासनाने मका खरेदीचे उद्दिष्ट (लिमिट) वाढवून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी प्रत्यक्ष आंदोलन स्थळी दाखल होत आंदोलकांशी चर्चा करीत निवेदन स्वीकारले. आंदोलकांच्या मागण्या शासनापर्यंत पाठविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी यावेळी दिले.
मोचार्चे नेतृत्व खासदार प्रशांत पडोळे, जिल्हा परिषदेचे सभापती शिक्षण समिती नरेश ईश्वरकर यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके, जि. प. सभापती आनंद मल्लेवार, अनिता नलगोपालवार, शितल राऊत, जि. प. सदस्य मोहन पंचभाई, प्रेमदास वनवे, गंगाधर जिभकाटे, देवा इलमे, राजू ढबाले, रसिका रंगारी, उमेश पाटील, विशाखा माटे, सुनीता नवघरे, पूजा हजारे, विद्या कुंभारे, रजनिष बनसोड, स्वाती वाघाये, मनिषा निंबार्ते, माजी जि. प. सदस्य रमेश पारधी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, काँग्रेसचे मोहाडी तालुका अध्यक्ष राजेश हटवार, जिल्हा सरचिटणीस गजानन झंझाड, उमेश मोहतुरे, पवन वंजारी, प्यारेलाल वाघमारे, अनमोल साखरे, नितीन भोयर, मुकेश ठवकर, विविध गावांतील सरपंच, पालक शाळा समितीचे अध्यक्ष आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.