खमारीचे बाणा सव्वालाखे सभापती तर खडकीचे आशा बोंदरे उपसभापतीपदी अविरोध निवड

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : विदर्भाच्या पूर्वठोकार असलेल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पंचायत समितीतील अविश्वास प्रस्तावाच्या राजकारणानंतर अखेर नव्या नेतृत्वाची अधिकृत घोषणा झाली. गुरुवार दि.१६ जुलै २०२६ ला पार पडलेल्या सभापती व उपसभापती पदाच्या फेरनिवडणुकीत बाणा सव्वालाखे खमारी बुज यांची सभापतीपदी तर आशा सतीश बोंदरे खडकी यांची उपसभापतीपदी अविरोध निवड झाली. ऐनवेळी विरोधी उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज मागे घेतल्याने दोन्ही पदांसाठी मतदानाची वेळच आली नाही आणि पंचायत समितीच्या सत्तेची सूत्रे नव्या नेतृत्वाकडे गेली. सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर पंचायत समिती सदस्य बाणा सव्वालाखे यांनी तर उपसभापतीपदासाठी आशा सतीश बोंदरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

अविश्वास प्रस्तावानंतर पदावरून पायउतार झालेले माजी सभापती जगदीश शेंडे धोप यांनी सभापतीपदासाठी तर माजी उपसभापती रेवानंद चकोले पारडी यांनी उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल करून निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र नामनिर्देशन पत्रांची छाननी पूर्ण झाल्यानंतर जगदीश शेंडे व रेवानंद चकोले यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे पीठासीन अधिकारी तथा तुमसरचे उपविभागीय अधिकारी गणेश दिघे यांनी बाणा सव्वालाखे व आशा सतीश बोंदरे यांची अविरोध निवड जाहीर केली. गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे व सहाय्यक गटविकास अधिकारी गिरीधर सिंगनजुडे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. निकाल जाहीर होताच पंचायत समिती परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.या निवडीनंतर मोहाडी पंचायत समितीतील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शेवटपर्यंत अंतर्गत रस्सीखेच सुरू होती. मुंढरी बुज येथील उमेश भोंगाडे व आशा बोंदरे याच्यात उपसभापतीपदासाठी चुरस निर्माण झाली होती.

निवडणुकीच्या आदल्या दिवशी उमेश भोंगाडे यांनी उपसभापतीपदासाठी आग्रह धरल्याची चर्चा होती. मात्र आशा बोंदरे यांना यापूर्वीच शब्द दिला असल्याने निर्णय बदलण्यात आला नाही. त्यामुळे उमेश भोंगाडे नाराज असल्याचे बोलले जात होते. अविश्वास प्रस्तावानंतर पद गमावलेले माजी सभापती जगदीश शेंडे यांनी नामनिर्देशन अर्ज मागे घेतल्यानंतर कोणाशीही चर्चा न करता थेट सभागृहातून बाहेर पडणेही चर्चेचा विषय ठरला. त्यांच्या चेहºयावर नाराजी स्पष्ट दिसत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. नवनिर्वाचित सभापती बाणा सव्वालाखे व उपसभापती आशा सतीश बोंदरे यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. हार, दुपट्टे आणि गुलाल उधळत स्वागत सुरू असताना एका गटाकडून “एकच वादा…”, तर दुसºया गटाकडून “एकच भाऊ…” अशा घोषणा देण्यात आल्या. दोन आजी-माजी आमदारांच्या समर्थकांनी आपापल्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन करत जल्लोष साजरा केला.

दरम्यान, भाजप समर्थक पंचायत समिती सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वागत सोहळ्यापासून स्वत:ला दूर ठेवले.”त्यांना हार घालू द्या,गुलाल उधळू द्या; आम्ही त्यात सहभागी होणार नाही. आम्ही घड्याळवाले नाही,”अशी भूमिका त्यांनी घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत छायाचित्र काढणेही टाळले. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलिस स्टेशनचे त्रिमूर्ती केशव लांडगे, हरीचंद्र जैराम चाचेरे, स्वप्नील संतोष मते, सचिन चुन्नीलाल मालाधरे, हेमलता मलेवार, सविता दिंडे, विनोद शिवचरण लांगडे, दमयंती शिरम सावरकर, किरण मनोहर मोहतुरे, आशिष शिवराम वालदे, दिक्षा नखाते, अशोक बाबुराव लांजेवार, सुधेश लांजेवार, ताराचंद दाजी उराडे, विनोद यादोराव थोटे, मेघा बालकदास वैद्य, रामरतन लक्ष्मण खोकले, ज्ञानेस्वर भैय्या भलावीर, प्रभाकर बारापात्रे, विजय राघोर्ते, दिव्या शिवशंकर टांगले, दुर्योधन ईश्वर भुरे, नागोराव गायधने, भैय्या सुरेश शेंडे, पृथ्वीराज शामराव राठोड, कल्पना भांदुसा फड, मुकेश शिवशंकर भोंगाडे, सतिश सपकाळ, वामन केशोराव गायधने, ज्योत्स्ना सुरेश बाणासुरे, किरण लुटे, राजेंद्र भोंगाडे, बाळकृष्ण अशोक पाठक, देवेंद्र शिवलाल चोपकर, अल्फिया जाहिद हुसेन, इंदिरा घोनमोडे यांचा बंदोबस्त परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. मोहाडी पंचायत समिती परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन राजकीय गट आमने-सामने असूनही संपूर्ण प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीत पार पडली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *