भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहराला जोडणाºया कारधा वैनगंगा पुलावर मागील अनेक दिवसांपासून पथदिवे बंद असून पुलावर काळाकुट्ट अंधाराचे साम्राज्य आहे. याशिवाय रस्त्यावर दोन्ही बाजूने वाढलेली काटेरी झाडे असून जीव मुठीत घेऊन प्रवास म्हणजे अपघाताला दिलेले उघड निमंत्रणच आहे, मात्र प्रशासन अद्यापही डोळे झाकून आहेत. शाळा, नोकरी, सरकारी कामासाठी भंडाºयाला जायचं म्हणजे जीव धोक्यात घालावा लागतो. कारधा पुलाची ही अवस्था आहे. एकीकडे बंद पथदिवे, दुसरीकडे रस्त्यावर वाढलेली झाडे. दुचाकीस्वारांचा जीव टांगणीला लागला असून अंधारात अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रवासी नागरिकांनी सवाल उपस्थित केला आहे.
भंडारा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने शिक्षण, नोकरी आणि सरकारी कामांसाठी गावखेड्यातील शेकडो नागरिक व विद्यार्थी रोज दुचाकीने ये-जा करतात. मात्र कारधा पुलावरील सर्वच पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी पुलावरून वाहन चालवताना चालकांची पुरती कसरत होते. पावसाळ्यात पुलावर सुमारे दोन फुटापर्यंत पाणी साचले जाते. अंधार असल्यामुळे समोर येणाºया वाहनाचा प्रकाश डोळ्यावर पडतो, रोडच्या दोन्ही बाजूला मोठमोठी काटेरी झाडांच्या फांद्या वाढून थेट रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे दुचाकी आणि सायकलस्वारांसाठी असलेली जागाही शिल्लक राहिलेली नाही. रस्ता इतका अरुंद झाला आहे की समोरून दोन मोठी वाहने आली तरी बाजूला जागा मिळत नाही. दररोज शेकडो दुचाकीस्वार जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. सध्या पावसाळा जोरात सुरु झाला असून पुलावरील बंद दिव्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही करीता पुलावरील बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करावेत, आणि रस्त्यावर आलेली काटेरी झाडे- झुडुपे तोडावीत, अशी प्रवासी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.