जीव धोक्यात… सेवा मात्र निस्वार्थ!सर्पमित्रांना मानधन, विमा आणि शासकीय संरक्षण कधी?

गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : घरात, शेतात, कारखान्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी सर्प दिसताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. अशा वेळी कोणताही विचार न करता, दिवस असो वा मध्यरात्र, पाऊस असो वा वादळ स्वत:चा जीव धोक्यात घालून मदतीला धावून येतात ते म्हणजे सर्पमित्र. सर्प पकडून त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडत, मानव आणि वन्यजीव दोघांचेही प्राण वाचवणाºया या सेवकांना मात्र आजही शासकीय पातळीवर आवश्यक सुविधा मिळालेल्या नाहीत. राज्यातील सर्पमित्रांना ना मानधन, ना विमा, ना अधिकृत संरक्षण, ही वस्तुस्थिती चिंताजनक असून, त्यांच्या सेवेसाठी स्वतंत्र शासकीय धोरण राबविण्याची मागणी आता जोर धरत आहे.

जोखीम मोठी, आधार शून्य

सर्पमित्रांना एखादा फोन आला की, ते तत्काळ घटनास्थळी पोहोचतात. अनेकदा स्वत:च्या खिशातून प्रवास खर्च करावा लागतो. विषारी सर्प पकडताना क्षणभराची चूक जीवावर बेतू शकते. अनेक सर्पमित्रांना गंभीर दुखापती झाल्या असून काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. एवढ्या जोखमीचे कार्य करूनही त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही सक्षम यंत्रणा अस्तित्वात नाही.

पर्यावरणाचे खरे रक्षक

सर्प हे परिसंस्थेतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. उंदीर व इतर कीटकांवर नियंत्रण ठेवून ते शेतीचे संरक्षण करतात आणि अन्नसाखळीचे संतुलन राखतात. त्यामुळे सर्पांचे संरक्षण म्हणजेच पर्यावरण संवर्धन होय आणि हेच कार्य सर्पमित्र निस्वार्थपणे पार पाडत आहेत.

अंधश्रद्धा नव्हे, विज्ञानाचा मार्ग

समाजात आजही सर्पांविषयी अनेक गैरसमज प्रचलित आहेत, सर्व सर्प विषारी असतात, सर्प सूड घेतात, दूध पितात इत्यादी. प्रत्यक्षात याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. सर्प हा माणसाचा शत्रू नसून तो स्वत:च्या संरक्षणासाठीच प्रतिक्रिया देतो. त्यामुळे सर्प दिसल्यास त्याला ठार मारण्याऐवजी प्रशिक्षित सर्पमित्रांना बोलावणे हाच योग्य पर्याय आहे.

कायदेशीर बाबींची जाणीव आवश्यक

भारतातील अनेक सर्पांना वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षण मिळालेले आहे. त्यामुळे सर्प मारणे किंवा त्यांची तस्करी करणे हा दंडनीय गुन्हा आहे. सर्पबचावकार्य अधिक सुरक्षित आणि कायदेशीर करण्यासाठी शासनाने सर्पमित्रांची नोंदणी, अधिकृत प्रशिक्षण आणि ओळखपत्र प्रणाली लागू करण्याची गरज आहे. तसेच, ‘सर्पमित्र’ या नावाखाली होणाºया अवैध व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर देखरेख यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. एकंदरीत सर्पमित्रांचे संरक्षण म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण. त्यांच्या निस्वार्थ सेवेला सन्मान, सुरक्षितता आणि शासकीय पाठबळ देणे हीच खरी समाजसेवा ठरेल.

सर्पमित्रांच्या प्रमुख मागण्या

सर्पमित्रांना अधिकृत शासकीय मान्यता, मासिक मानधन किंवा प्रति बचावकार्य मोबदला, अपघात व आरोग्य विमा सुविधा, सर्पदंश उपचारासाठी मोफत वैद्यकीय मदत, आधुनिक उपकरणे, सुरक्षा किट व वाहन भत्ता, अधिकृत ओळखपत्र व प्रमाणित प्रशिक्षण, जिल्हास्तरीय हेल्पलाइन व नियंत्रण कक्ष, सर्पतस्करी रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा, उत्कृष्ट कायार्साठी शासनस्तरीय सन्मान.

जनतेला आवाहन

सर्प दिसल्यास घाबरून जाऊ नका. त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका. सुरक्षित अंतर ठेवा आणि तात्काळ प्रशिक्षित सर्पमित्र किंवा प्रशासनाशी संपर्क साधा. सर्प वाचवणे म्हणजे निसर्ग वाचवणे आणि निसर्ग वाचवणे म्हणजे आपले भविष्य सुरक्षित ठेवणे होय.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *