भंडारा जिल्ह्यात तीन गळफास व एक विषप्राशनाच्या घटनांनी खळबळ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील पवनी, सिहोरा, भंडारा आणि जवाहरनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या दोन दिवसांत चार वेगवेगळ्या मृत्यूंच्या घटना घडल्या असून, या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ च्या कलम १९४ अन्वये मर्ग नोंदवून तपास सुरू केला आहे. गळफास घेऊन आत्महत्या तसेच विषारी औषध प्राशनामुळे झालेल्या मृत्यूंमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवडसी येथील दिलीप दत्तू सेलोकर (वय ६७) यांनी ३० जुलै रोजी सकाळी सुमारे ५.४५ वाजताच्या सुमारास घरासमोरील उमरीच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी मर्ग क्र. ४२/२०२६ नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार वकेकार करीत आहेत. सिहोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवसर्रा येथील अर्जुन धर्मा शेंदरे (वय ५५) हे दारूच्या व्यसनाधीन असल्याची माहिती समोर आली आहे.

२९ जुलैच्या रात्री पत्नीशी वाद झाल्यानंतर त्यांनी घरातील दरवाजे आतून बंद करून हॉलमधील पंख्याला गळफास घेतल्याचे आढळून आले. कुटुंबीयांनी आवाज दिल्यानंतर प्रतिसाद न मिळाल्याने खिडकीतून पाहिले असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. या घटनेप्रकरणी मर्ग क्र. ९/२०२६ दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार कळपते करीत आहेत. भंडारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरगाव येथील सुवर्णा कवडू गमवीर (वय ४८) यांनी २८ जुलै रोजी विषारी औषध प्राशन केल्याची माहिती आहे. त्यांच्यावर भंडाºयातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, ३० जुलै रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मेमोवरून मर्ग नोंद करण्यात आली असून या घटनेचा तपास पोलीस हवालदार लोकेश वासनिक करीत आहेत.

जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परसोडी येथील सत्यम सुधीर पोटभरे (वय २६) हा आपल्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सकाळी नातेवाईकांनी दार उघडत नसल्याने खिडकीतून पाहिले असता तो पंख्याला लटकलेला दिसला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दरवाजा तोडून त्याला खाली उतरविण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, सत्यम हा सीआरपीएफ भरतीसाठी नागपूर येथे गेला होता. भरती न झाल्यामुळे तो मानसिक तणावात असल्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली असून, मृत्यूबाबत कोणावरही संशय नसल्याचे फियार्दीने पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी मर्ग क्र. १५/२०२६ नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गोंडाणे करीत आहेत. चारही घटनांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १९४ अन्वये मर्ग नोंदवून मृत्यूची नेमकी कारणे शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *