भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोबरवाही : तुमसर-रामटेक महामार्गावर धोपजवळ रविवारी, १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून, या दुदैर्वी घटनेने सुंदरटोला, गोबरवाही आणि फुटाळा परिसरात शोककळा पसरली आहे. या भीषण अपघातात संदीप मनोहर वरखडे (वय २६, रा. फुटाळा) आणि यश लोकचंद पुसाम (वय २१, रा. गोबरवाही) या दोन युवकांचा मृत्यू झाला.
दोघेही रविवारी सायंकाळी दुचाकीने प्रवास करीत होते. मिळालेल्या माहितीनुसार, संदीप वरखडे आणि यश पुसाम हे जांबकडून तुमसरच्या दिशेने होंडा शाईन १६० सीसी दुचाकीने जात होते. त्यांची दुचाकी एमएच ३६ एपी ४७३२ असल्याचे समजते. धोपजवळ ते आले असता मागून अथवा समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की, दोन्ही युवक रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, अपघात नेमका कशामुळे झाला आणि धडक देणारे वाहन कोणते होते, याचा तपास सुरू आहे. मृत यश लोकचंद पुसाम हा दोन भावांपैकी मोठा भाऊ असल्याची माहिती आहे. त्याची आई आशा सेविका असून वडील मॅग्नीज प्लांटमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत असल्याचे समजते. तरुण वयातच यशचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संदीप वरखडे आणि यश पुसाम यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोक व्यक्त करण्यात आला. गोबरवाही, सुंदरटोला आणि फुटाळा परिसरातील नागरिकांमध्येही या घटनेने हळहळव्यक्त होत आहे.
दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरील परिस्थिती, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंधळगाव पोलीस ठाणेदार नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. अज्ञात वाहनचालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. तरुण वयातील दोन युवकांचा एका क्षणात झालेला दुर्दैव अंत ही घटना परिसरासाठी मोठा धक्का ठरली असून, महामार्गावर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.