खापा येथे ग्रामसभा ठरली वादळी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

खापा : तुमसर तालुक्यातील खापा येथील आयोजित ग्रामसभेत गावच्या मूलभूत प्रश्नावरून जोरदार गदारोळ झाला. पाणीपुरवठा आणि घरकुल योजनेतील अनियमिततेच्या मुद्द्यावरून नागरिक अत्यंत आक्रमक झाले असून, ग्रामसभेचे अध्यक्ष आणि सरपंच गावकर्‍यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले.

नागरिकांचा प्रश्नांचा भडीमार

सभा सुरू होताच गावकर्‍यांनी प्रशासकीय कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. गांधी वाडीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आणि रखडलेल्या घरकुल योजनांवरून उपस्थितांनी सभेचे अध्यक्ष व सरपंचांना धारेवर धरले. स्थानिक नागरिक नाना ठवकर यांनी गावातील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आणि इतर नागरी सोयी-सुविधांबद्दल थेट सवाल उपस्थित केले. मात्र, या प्रश्नांची उत्तरे देण्यास सरपंच असमर्थ ठरल्याने सरपंच कीर्ती राजेंद्र पिकलमुंडे यांचे चांगलीच धांदल उडाली.

अनेक प्रश्न अनुत्तरित

गावातील विकासकामांचा निधी कुठे गेला आणि पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना का भटकंती करावी लागत आहे, अशा अनेक मुद्द्यावरून नागरिकांनी उत्तर मागीतले. परंतु, ग्राम पंचायत प्रशासनाकडून कोणतेही ठोस उत्तर न मिळाल्याने गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संजय झंजाळ, राजेश ठवकर, आकाश पिकलमुंडे, आकाश ठवकर, अनिकेत ठवकर, मोनू वंजारी, रोशन झाडे यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले परंतु प्रश्न अनुत्तरित राहिल्याने ही ग्रामसभा वादळी आणि अनिर्णित ठरली. गावातील समस्या लवकरात लवकर सोडवल्या नाहीत तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त गावकऱ्यांनी दिला आहे.

ग्रामसेवकाने दिले मोफत पाण्याचे आश्वासन

नाना ठवकर यांनी पाण्याचा प्रश्न मोठ्या गांभीर्याने मांडल्यामुळे जिथपर्यंत गांधी वार्डाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत गांधी वार्ड व गावातील लोकांना मोफत आरो पाणी देण्याचे आश्वासन ग्राम विकास अधिकारी संतोषवार यांनी आमसभेमध्ये जाहीर केले. त्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *