अंगावर भिंत कोसळुन २ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया: पावसाच्या संततधारेने जीर्ण झालेल्या घरांची भिंत अचानक कोसळून दोन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक्षा मुकेश राऊत (वय २, रा. कोरंभी) असे मृत बालिकेचे नाव आहे. सोमवार २४ आॅगस्टला दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना खामसुरा येथे घडली. खामखुरा येथील विलास नेवारे यांच्या पडक्या घराची भिंत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर्णपणे ओली व कमकुवत झाली होती. त्याच परिसरात प्रतीक्षा अंगनात खेळत असताना अचानक भिंत तिच्यावर कोसळली. काही कळायच्या आत चिमुकली भिंतीखाली दबली आणि तिचा जागीच अंत झाला. प्रतीक्षाचे आई-वडील शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कामानिमित्त तिचे वडील तिला दररोज सकाळी खामखुरा येथील नातेवाईक केशव नेवारे यांच्या घरी आणून ठेवत आणि सायंकाळी पुन्हा तिला कोरंभी येथील घरी घेऊन जात. रोजच्या या निरागस दिनक्रमावर सोमवारी नियतीने घाला घातला. ज्या अंगणात चिमुकलीचे बालपण बहरत होते, तेच अंगण तिच्या आयुष्याचा अखेरचा साक्षीदार ठरले.घटनेची माहिती खामखुरा चे पोलिस पाटील जयप्रकाश लाडे यांनी बीट अंमलदार सुभाष डोंगरावर यांना दिली. अजुर्नी मोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व घटनास्थळाची पाहणी केली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *