श्रीकृष्णाच्या मूर्ती घेण्यासाठी चिखलातून वाट!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त तुमसर नगरपरिषद प्रशासनाने कस्तुरबा ढंगारे शाळेच्या परिसरात श्रीकृष्णाच्या मूर्ती विक्रीसाठी दुकाने उपलब्ध करून दिली. प्रशासनाचा हा निर्णय स्तुत्य असला, तरी पावसामुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने मूर्ती खरेदीसाठी आलेल्या भाविकांना अक्षरश: चिखलातून वाट काढावी लागली. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मूर्ती खरेदीसाठी कस्तुरबा ढंगारे शाळेत पोहोचले. मात्र, पावसामुळे संपूर्ण परिसर चिखलमय झाला होता. त्यामुळे लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठी कसरत करावी लागली.

मूर्ती घेऊन चिखलातून बाहेर पडताना भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. या गैरसोयीबद्दल अनेक भाविकांनी नगरपरिषद प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली. मुरूम टाकणे एवढेही अवघड होते काय: तुमसर नगरपरिषदेकडे शहरात अनेक मोकळे भूखंड तसेच विविध मालमत्ता उपलब्ध आहेत. मुख्यबाजारपेठेत भाजी बाजाराचीही व्यवस्था आहे. अशा परिस्थितीत श्रीकृष्ण मूर्ती विक्रीसाठी कस्तुरबा ढंगारे शाळेची जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला, हे निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र, पावसाळ्याच्या दिवसांत येथे चिखल होण्याची शक्यता प्रशासनाच्या लक्षात येणे अपेक्षित होते. किमान मूर्ती विक्री सुरू होण्यापूर्वी परिसरात मुरूम टाकून मार्ग सुकर करता आला असता. नगरपरिषद प्रशासनाने भविष्यात अशा धार्मिक व सार्वजनिक उपक्रमांसाठी जागा उपलब्ध करून देताना नागरिकांच्या सोयी- सुविधांकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

नगरपरिषद मालकीची कस्तुरबा ढंगारे शाळेच्या पटांगणावर नगर परिषदद्वारे श्रीकृष्ण व गणेशजी विक्रेत्यांना दुकाने लावण्याकरिता हजार रुपये प्रति दुकानदाराकडून टॅक्स स्वरूपात आकारण्यात येते व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. परंतु पावसामुळे चिखल साचला असेल मात्र यानंतर त्याची दक्षता नगर परिषदद्वारे घेण्यात येईल.

शामकला सिंघनजुडे, बाजार विभाग प्रमुख, नग् ारपरिषद तुमसर.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *