भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातील बोपेसर येथे एका कोल्हीने दोन व्यक्तींवर हल्ला करून त्यांना जबर जखमी केल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोपेसर येथील शेतकरी कोमल परमानंद पटले (वय ६०) हे गावालगतच्या शेतात तणस आणण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक एका कोल्हीने त्यांच्यावर हल्ला केला. पटले यांच्यावर हल्ला होत असल्याचे पाहून आनंदराव महादेव कटरे (वय ५५) हे त्यांच्या मदतीसाठी धावून गेले. मात्र, आक्रमक झालेल्या कोल्हीने कटरे यांच्यावरही हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच गावकºयांनी तत्काळ दोन्ही जखमींना उपजिल्हा रुग्णालय, तिरोडा येथे दाखल केले. दोघांवरही उपचार सुरू आहेत. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही व्यक्तींना वन विभागाने तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य जे. पी. पटले यांनी केली आहे. या घटनेनंतर परिसरात कोल्ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.