भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मोहाडी तालुक्यातील धोप येथील शेतकरी राजेंद्र अंबर सपाटे यांचा गुरुवारी ८ आॅक्टो. ला विहिरीत मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासमोर अश्रू ढाळत मांडणाºया या शेतकºयांने आत्महत्या केल्याने दुष्काळाच्या संकटाची तीव्रता पुन्हा अधोरेखित झाली आहे. माज्या शेतात पाणी नाही,धान मरणाच्या अवस्थेत आहे. शेतीचे पंचनामे त्वरित करून मोबदला द्या साहेब, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? काहीतरी करा साहेब, नाहीतर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. अशी व्यथा याच आठवड्यात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासमोर अश्रू ढाळत मांडणाºया सपाटे यांच्याकडे सुमारे साडेचार ते पाच एकर शेती होती.
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने धानपीक करपले असून, जमिनीला भेगा पडल्या होत्या. शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे उच्च शिक्षण अवलंबून असल्याने आर्थिक विवंचना वाढली होती. ३ आॅक्टोबर रोजी पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या दुष्काळ पाहणी दौºयात सपाटे यांनी रडत-रडत आपली व्यथा मांडली होती. यावेळी त्यांनी ‘मी लिहून देतो; मात्र माझ्या फाईली फेकतात,’ असेही सांगितल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे यापूर्वी प्रशासनाकडे केलेल्या अर्जांवर काय कार्यवाही झाली, याची चौकशी करण्याची मागणी आता होत आहे. गुरुवारी सकाळी शेतातील विहिरीत सपाटे यांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच अधिकारी व पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
डेप्युटी कलेक्टर जाधव, तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, कृषी अधिकारी सुनील भडके,आदींनी परिस्थिती हाताळली. कुटुंबीय व ग्रामस्थांनी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका मुलाला शासकीय नोकरी देण्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह बाहेर काढू न देण्याची भूमिका घेतली. प्रशासनाने पालकमंत्र्यांशी संपर्क साधल्यानंतर मागण्या मान्य करण्याबाबत लेखीआश्वासन देण्यात आले. त्यानंतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेचा पुढील तपास आंधळगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.