भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा-बघेडा : भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी दिनांक ६ व ७ आॅक्टोबर २०२६ रोजी गोबरवाही पोलीस ठाण्याला वार्षिक तपासणीदरम्यान भेट देऊन पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या कामकाजाची पाहणी करण्यासोबतच विविध अभिलेख, मालखाना तसेच दारुगोळ्याची तपासणी केली. वार्षिक तपासणीदरम्यान सहाय्यक पोलीसदार ते पोलीस हवालदार यांचा सीट रिमार्क घेण्यात आला.
पोलीस ठाण्यातील मालखान्यातील मुद्देमाल तसेच दारुगोळ्याची तपासणी करून संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात मुक्काम करून ७ आॅक्टोबर रोजी पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेतली. यानंतर पोलीस अधिकारी व अंमलदारांचा दरबार घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कामकाजाचा आढावा घेत संबंधितांना मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस ठाण्यातील विविध अभिलेखांची तपासणी करून आवश्यक त्या सुधारणा व नोंदींबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी बघेडा पोलीस चौकीला भेट दिली.
यावेळी गावातील परिस्थिती, हिष्ट्रीशीटर व्यक्ती तसेच चौकीतील अभिलेखांची तपासणी करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
मॅग्निज चोरी रोखण्यासाठी कडक उपाययोजनांचा आढावा
यानंतर डोंगरी बुजुर्ग येथील मॉयल परिसरात बैठक घेण्यात आली. या बैठकीला सीएमडी, एजंट, मॉईल मॅनेजर, सिक्युरिटी इन्चार्ज तसेच चिखला, डोंगरी आणि कुरमुडा येथील सरपंच उपस्थित होते.
मॅग्निज चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. परिसरात वॉच टॉवर उभारणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, वॉल कंपाऊंडची उंची वाढविणे, तसेच सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याबाबत पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी संबंधित अधिकाºयांना सूचना दिल्या. मॉयल परिसरातील सुरक्षाव्यवस्था, स्थानिक पातळीवरील समन्वय आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. मॅग्निज चोरी रोखण्यासाठी पोलीस विभाग, मॉईल प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि ग्रामपंचायतींनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.