भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : निसर्गरम्य जलाशयाच्या सान्निध्यात वसलेल्या रावणवाडी येथील जागृत अंबामाता देवस्थानात यंदाही नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. रावणवाडी व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात येणार असून, घटांच्या पवित्र ज्योतींनी अंबामाता देवस्थान परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघणार आहे. रविवार, दि. ११ आॅक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजता घटस्थापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ६.१५ वाजता ज्योतप्रज्वलनासाठी विशेष मान्यवर उपस्थित राहणार असून नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने विविध भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वाकेश्वर, पहेला, रावणवाडी, सोनेगाव, बोरगाव तसेच परिसरातील विविध भजन मंडळे या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होणार आहेत. भजनांच्या स्वरांतून देवीचा जागर, भक्तिगीतांचा गजर आणि आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती भाविकांना मिळणार आहे. सोमवार, दि. १९ आॅक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता कलश यात्रा, घटविसर्जन आणि त्यानंतर महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावणवाडी जलाशय परिसर आणि अंबामाता देवस्थान परिसर सजविण्यात आला असून, नवरात्र महोत्सवासाठी ग्रामस्थ व देवस्थान समितीच्या वतीने विशेष तयारी करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अंबामाता देवस्थान समितीचे अध्यक्ष यादोराव कुथे, उपाध्यक्ष ईश्वर मस्के, सचिव जगदीश उईके, कोषाध्यक्ष सचिन मस्के, सहसचिव शेषराव पंधरे आणि संयोजक अविनाश उईके परिश्रम घेत आहेत. तसेच संचालक मंडळातील मोतीसिंग वरखडे, शेषराव मते, रवींद्रसिंह उईके, राम वखरकार, ज्ञानेश्वर मरसकोले, हिरालाल भलावी, नथु फेंडर, सौ. कविता कीर्ती उईके, सौ. शांताबाई उईके आणि सौ. श्यामकला कानतोडे यांच्यासह ग्रामस्थ व भाविकांचे सहकार्य लाभत आहे. श्रद्धा, भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा संगम असलेल्या या नवरात्र महोत्सवात रावणवाडी व परिसरातील सर्व ग्रामस्थ, भाविक भक्त आणि भजन मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि उत्सवाची शोभा वाढवावी, त्याचप्रमाणे ज्या भाविकांना नवरात्र निमित्त घटांची नोंदणी करावयाची असेल त्यांनी समिती सदस्यांसोबत संपर्क करावे असे आवाहन अंबामाता देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.