मोटारसायकलसह ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
भंडारा : कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारधा मच्छीमार्केट चौक परिसरात सुरू असलेल्या जुगारामध्ये पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, रोख रकमेसह मोटरसायकल व जुगाराचे साहित्य असा एकूण ७१ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी सूत्र दिलेल्या माहितीनुसार, कारधा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस नाईक चामट व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. कारधा येथील मच्छीमार्केट चौकात पैशांची हारजीत लावून जुगाराचा खेळ सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली.
या कारवाईदरम्यान विश्वनाथ गजानन बावणे (वय ४३ वर्षे, रा. चांदनी चौक, भंडारा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून जुगाराच्या खेळासाठी वापरण्यात येणारे साहित्य, कागदावर लिहिलेल्या सट्टापड्या, एक निळा कार्बन तुकडा, एक निळे बॉलपेन, १ हजार ७१० रुपये रोख आणि हिरो कंपनीची निळ्या रंगाची मोटरसायकल (क्रमांक एमएच ३६-AF-७०१८), अंदाजे किंमत ७० हजार रुपये, असा एकूण ७१ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अपराध क्रमांक ७७०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कारधा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तेजस सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बोरकर, पोलीस हवालदार राहंगडाले, पोलीस हवालदार टेंभुर्णे, पोलीस हवालदार बोरकर, पोलीस नाईक चामट व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पथकाने केली.