दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

भंडारा : शहरातील राजीव गांधी चौक परिसरातून चोरीला गेलेल्या मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात साकोली उपविभागीय पोलीस पथकाला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३१ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले असून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.

दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी भंडारा येथील राजीव गांधी चौक परिसरातून अज्ञात चोरट्याने काळ्या रंगाची पॅशन प्रो मोटरसायकल (क्रमांक एमएच ३६ Q २७८७), अंदाजे २० हजार रुपये किमतीची, चोरून नेली होती. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात अप. क्र. २१६५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, २१ ऑक्टोबर रोजी साकोली उपविभागाचे पथक लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, गुन्ह्यातील संशयित आरोपी तेजस उर्फ तेजराम आडे (३१ वर्षे, रा. फोंढा, ता. पवनी, जि. भंडारा) हा लाखनीकडून भंडाऱ्याकडे चोरीच्या मोटरसायकलने जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधाराने पोलिसांनी राजेगाव एमआयडीसी परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील वाहन व कागदपत्रांची चौकशी केली असता, त्याने सदर मोटरसायकल भंडारा येथील राजीव गांधी चौकातून चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भंडारा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे आणि पो. निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा व साकोली उपविभागीय पोलीस पथकाने केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *