महिलेवर भंडारा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
तिरोडा : तालुक्यातील वडेगाव येथे घरात शिरलेल्या रानडुकराने हल्ला केल्याने ६५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. छायाबाई हेमराज बडगे असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांच्यावर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास छायाबाई बडगे या आपल्या घरातील खाटेवर झोपल्या होत्या. यावेळी घरात शिरलेल्या रानडुकराने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना खाटेवरून खाली पाडले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. महिलेने अर्डाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत रानडुकराला हाकलून लावले. त्यानंतर जखमी महिलेला तातडीने तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच तिरोडा वन विभागाचे क्षेत्र सहायक आय. एल. सोनकुसरे, वनरक्षक सी. पी. पारधी यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली. वन विभागामार्फत योग्य ती मदत करण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी क्षेत्र सहायक सोनकुसरे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाचे कर्मचारी आणि आरआरटी (रेस्क्यू रिस्पॉन्स टीम) पथकाने वडेगाव येथे जाऊन परिसराची पाहणी केली. जखमी महिलेच्या घराजवळ केरकचऱ्याचे मोठे ढीग असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी रानडुकरांचा वावर असल्याने परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन वन विभागाने नागरिकांना केले.
परिसरात केरकचरा सागू देऊ नये आणि कोणतेही जंगली प्राणी आढळल्यास तातडीने वन विभागाला कळवावे असे आवाहन कर्मचाऱ्यांनी केले. तसेच परिसरत नियमित गस्त घालण्यात येईल, असेही सांगितले.
तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमी महिलेला पुढील उपचारासाठी २१ ऑक्टोबर रोजी भंडारा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती क्षेत्र सहायक सोनकुसरे यांनी दिली.