भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जन्मदात्या आईसह स्वत:च्या नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाºया नराधमाला जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष सत्र न्यायाधीश के. एन. गौतम यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. आरोपीला विविध कलमांनुसार कारावासासह एकूण १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपी ३६ वर्षांचा असून तो अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. २ एप्रिल २०२५ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्याची नऊ वर्षीय मुलगी घरात झोपलेली असताना, मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आरोपीने तिच्यावर बळजबरी केल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, या घटनेच्या सुमारे चार महिन्यांपूर्वी आरोपीने स्वत:च्या आईवरही बळजबरी केल्याची तक्रार पीडितेच्या आईने दिली होती. मुलगी आणि आई या दोघींवर अत्याचार केल्यानंतर, या घटनांची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या प्रकरणी केशोरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६५(२), ११५(२), २५२ आणि ३५१(३), तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अर्थात पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६ आणि ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच विविध कलमांनुसार कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. स्वत:च्या कुटुंबातीलच आई आणि चिमुरड्या मुलीवर अत्याचार केल्याच्या या गंभीर प्रकरणातील न्यायालयीन निकालामुळे परिसरात या घटनेची चर्चा होत आहे.