भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : ‘जन्मोजन्मीची साथ देऊ, सुख-दु:खात एकमेकांना कधीच सोडणार नाही’ अशी शपथ घेऊन आयुष्यभर एकमेकांच्या सोबतीने संसार करणाºया पती-पत्नीने मृत्यूलाही एकमेकांची साथ सोडली नाही. पतीच्या निधनाचा धक्का पत्नीला बसल्यानंतर अवघ्या एका तासात त्यांनीही अखेरचा श्वास घेतला. तब्बल सहा दशकांच्या सहजीवनानंतर एकाच दिवशी दोघांनीही जगाचा निरोप घेतल्याने भंडारा तालुक्यातील सिल्ली गावावर शोककळा पसरली. सिल्ली येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक व्यंकटराव डोमाजी खोब्रागडे (वय ८७) यांचे मंगळवारी सकाळी साडेसात वाजता राहत्या घरी निधन झाले.
वृद्धापकाळामुळे ते काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांनी पत्नी इंदिरा व्यंकटराव खोब्रागडे (वय ७८) यांना दिली. त्यावेळी इंदिरा खोब्रागडे उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत्या. पतीच्या निधनाची बातमी कानी पडताच त्यांना मोठा धक्का बसला. आयुष्यभराची साथ अचानक संपल्याची जाणीव सहन न झाल्याप्रमाणेच त्यांनीही सकाळी साडेआठच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. पतीच्या निधनानंतर अवघ्याएका तासात पत्नीनेही प्राण सोडल्याने ‘जन्मोजन्मीची साथ’ या शब्दांचा अक्षरश: प्रत्यय आला. या दाम्पत्याचा संसार तब्बल ६० वर्षांचा होता.
या प्रदीर्घ सहजीवनात त्यांनी सुख-दु:खाचे असंख्य प्रसंग एकत्र अनुभवले. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एकमेकांना आधार देत त्यांनी संसाराचा गाडा पुढे नेला. वृद्धापकाळातही दोघांची साथ कायम होती. अखेर जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावरही नियतीने त्यांची साथ कायम ठेवली. मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास सिल्ली येथील स्थानिक स्मशानभूमीत पती-पत्नीवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांना एकत्र मुखाग्नी देण्यात आला. आयुष्यभर एकमेकांचा हात हातात घेऊन चाललेल्या या दाम्पत्याला अखेरच्या प्रवासातही एकत्र निरोप देण्यात आला. हा प्रसंग पाहतानाउपस्थित कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थ भावूक झाले. व्यंकटराव व इंदिरा खोब्रागडे यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. भंडारा पंचायत समितीचे सदस्य तथा माजी उपसभापती प्रशांत खोब्रागडे यांचे ते आई-वडील होत. त्यामुळे त्यांच्या अंत्ययात्रेला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, नातेवाईक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहा दशकांची अखंड साथ एका दिवसात संपली; मात्र मृत्यूलाही एकमेकांपासून दूर जाता आले नाही. सिल्लीतील या दाम्पत्याच्या निधनाने ‘साथ जन्मोजन्मीची असते’ या भावनेला जणू नवा अर्थ मिळाला.