शौचालयात लपलेल्या बिबट्याचे दोन तासांच्या थरारक मोहिमेनंतर यशस्वी रेस्क्यू; मोठी जीवितहानी टळली
नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये भीतीचे सावट; मृत शेळ्यांच्या नुकसानभरपाईची ग्रामस्थांची मागणी
साकोली, दि. २४ : नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या चांदोरी गावात शुक्रवारी पहाटे बिबट्याने घातलेल्या धुमाकुळामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. एका रात्रीत दोन शेळ्यांचा फडशा पाडल्यानंतर बिबट्या गावातील एका घराच्या शौचालयात लपून बसला. बिबट्याला पाहण्यासाठी गेलेल्या उपसरपंच जितेंद्र रहाटे व मंगेश झोडे यांच्यावर त्याने हल्ला करून जखमी केले. घटनेची माहिती मिळताच वन विभाग, एनएनटीआरचे अधिकारी, पोलीस ,लोकप्रतिनिधी माहेश्वरी नेवारे व ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू केले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून मृत दोन शेळ्यांच्या मालकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

साकोली तालुक्यातील चांदोरी हे गाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या लगत असल्याने वन्यप्राण्यांचा वावर सातत्याने वाढत आहे. शेतातील कामे, पावसाळी हंगाम आणि विद्यार्थ्यांची शाळा सुरू असताना गावात शिरलेल्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. वारंवार होत असलेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे प्रशासनाने कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांसह माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. माहेश्वरी नेवारे यांनी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने प्रथम गुलाब हातझाडे यांच्या घरातील चार महिन्यांच्या शेळीच्या बछड्यावर हल्ला करून त्याला ठार केले. त्यानंतर त्याने रमेश हातझाडे यांच्या घरात प्रवेश करून आणखी एका शेळीचा फडशा पाडला. सलग दोन ठिकाणी हल्ले केल्यानंतर बिबट्या गावातील मोरेश्वर हातझाडे यांच्या घराच्या परिसरातील शौचालयात जाऊन लपून बसला.
पहाटेपासून गावात बिबट्या असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पहाटे सुमारे ५ ते १० वाजेदरम्यान बिबट्या शौचालयात दबा धरून बसला होता. दरम्यान, बिबट्याला पाहण्यासाठी गेलेल्या चांदोरीचे उपसरपंच जितेंद्र रहाटे व मंगेश झोडे यांच्यावर त्याने अचानक झडप घालत हल्ला केला. यात दोघेही किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण अधिकच तीव्र झाले.
घटनेची माहिती मिळताच भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. माहेश्वरी हेमराज नेवारे यांनी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने कारवाईची मागणी केली.
यानंतर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्प (एनएनटीआर) चे विशेष रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या सहकार्याने परिसर सुरक्षित करण्यात आला. नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या. सुमारे दोन तासांच्या नियोजनबद्ध आणि धाडसी मोहिमेनंतर बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात वन विभागाला यश आले.
रेस्क्यू करण्यात आलेला बिबट्या अंदाजे पाच ते सहा वर्षांचा नर असल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले. त्यानंतर वन्यजीव वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची सखोल वैद्यकीय तपासणी केली. बिबट्याची प्रकृती समाधानकारक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला एनएनटीआर अंतर्गत सोनेगाव वनक्षेत्रातील बुंदेलखंड वन परिसरात सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले.
या संपूर्ण कारवाईदरम्यान वन विभाग, एनएनटीआरचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त होत आहे. मात्र, नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर चिंतेचा विषय बनला असून शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या दोन शेळ्यांच्या मालकांना वन विभागामार्फत तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संवेदनशील गावांमध्ये विशेष गस्त, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.