भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर विविध मतदान केंद्रांवर पदवीधर मतदारांनी हजेरी लावली. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व जिल्हे मिळून जवळपास ३९ टक्के मतदान झाले होते. भंडारा जिल्ह्यात दुपारी दोन वाजेपर्यंत ३६.८५ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. मागील निवडणुकीतील ६४.३८ टक्क्यांचा आकडा गाठण्यात यंदा यश येईल का? याकडे राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागले आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघात महायुतीचे सुधाकर कोहळे व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत आहे. मात्र, एकूण ३८ उमेदवार रिंगणात असल्याने कोणाचे पारडे जड आहे? याचा अंदाज अनेक राजकीय धुरंदरांना बांधता आलेला नाही. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदारांची पावले मतदानकेंद्रांकडे वळू लागली. मतदान केंद्रांच्या परिसरात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती. मतदारांना मतदान केंद्र शोधण्यापासून ते मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यापर्यंत कार्यकर्ते सक्रिय दिसून आले.
९९ हजार ३७८ मतदारांनी बजावला हक्क
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या यंत्रणा कामाला लागल्या होत्या. दुपारी २ वाजेपर्यंत विभागातील एकूण २ लाख५५ हजार ६०३ मतदारांपैकी ९९ हजार ३७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यानुसार, विभागातील मतदानाची टक्केवारी ३८.८८ झाली. भंडारा जिल्ह्यात दुपारी २ वाजेपर्यंत ७ हजार ८६८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ५ हजार ३०८ पुरुष आणि २ हजार ५६० महिला मतदारांचा समावेश आहे. सकाळच्या उत्साहानंतर दुपारपर्यंत मतदानाची गती कशी राहते आणि उर्वरित वेळेत मतदारांचा प्रतिसाद किती वाढतो? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. दुपारी २ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, विभागात पुरुष मतदारांची मतदानाची टक्केवारी ४२.९०, तर महिला मतदारांची टक्केवारी ३३.४२ आहे. एकूण मतदानाची टक्केवारी ३८.८८ इतकी नोंदविण्यात आली आहे.
माजी खा.सुनील मेंढे यांचे सपत्नीक मतदान
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज माजी खासदार सुनील मेंढे व सौ. शुभांगी मेंढे यांनी लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे मतदानाचा हक्क बजावला.तसेच मतदान केंद्रावर (बूथ) भेट देऊन तेथील मतदान प्रक्रियेचा व व्यवस्थेचा आढावा घेतला. मतदान हा केवळ आपला अधिकार नाही, तर लोकशाहीप्रती असलेली आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. प्रत्येक मताला महत्त्व आहे आणि प्रत्येक मतदाराचा सहभाग लोकशाहीला अधिक बळकट करतो असे सुनील मेंढे यांनी सांगितले. तसेच नागपूर विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी आवर्जून मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.